मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेलं आहे. सचिननं फक्त भारतीय क्रिकेटप्रेमींना किंवा त्याच्या चाहत्यांनाच नाही तर तमाम भारतीयांना असंख्य आठवणी दिल्या. या सर्व आठवणी त्याच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय आहेत. पण खुद्द सचिनसाठी अशी कोणती आठवण अविस्मरणीय आहे? असा प्रश्न जर कुणाला पडला, तर त्याचं उत्तर खुद्द सचिन तेंडुलकरनंच दिलं आहे. सचिननं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिननं त्याच्या लहानपणीच्या सरावाच्या दिवसांमधली एक भन्नाट आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

३१५ नंबरची बस…!

सचिननं या व्हिडीओमध्ये त्याच्या सरावाच्या दिवसांमध्ये तो ज्या बसने घरातून शिवाजी पार्कपर्यंत जायचा, त्या बससोबतच शूट केलं आहे. “खूप वर्षांनंतर ३१५ बसचा नंबर पाहिला. कारण ३१५ नंबरच्या बसने मी कलानगरहून शिवाजी पार्कला प्रॅक्टिससाठी जायचो. मी तेव्हा खूप एक्साईट असायचो की कधी मी शिवाजी पार्कवर जाईन आणि सराव करेन”, असं सचिन तेंडुलकर या व्हिडीओमध्ये सांगतोय.

सचिनची फेव्हरेट सीट..!

याच व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकरनं ३१५ नंबरच्या बसमधल्या आफल्या फेव्हरेट सीटविषयी देखील आठवणींना उजाळा दिला आहे. “दिवसभर प्रॅक्टिस केल्यानंतर, मॅच खेळल्यानंतर आम्ही फार थकून जायचो. संध्याकाळी घरी परत जाताना मी आशा करायचो की माझी आवडती सीट अर्थात बसमधली शेवटची सीट रिकामी असावी. कारण तिथे बसून फार मजा यायची. खिडकीत डोकं ठेवून झोपून जायचो, थंड हवा लागायची. अनेकदा माझा बसस्टॉप देखील चुकायचा. पण मजा यायची!”

सचिनची अविस्मरणीय कारकिर्द!

सचिन तेंडुलकरनं आपल्या दोन दशकांहून जास्त काळ बहरलेल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. २०१३ मध्ये क्रिकेटला अलविदा करण्यापूर्वी सचिननं १०० शतकांचा अशक्यप्राय वाटणारा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. १९८९मध्ये सचिननं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. वकार युनूस, सलील अंकोले अशा फलंदाजांच्या काळजात धडकी भरवणाऱ्या भेदक गोलंदाजीचा सामना करणाऱ्या सचिननं पुढे गोलंदाजांच्या काळजात धडकी भरेल असा करिश्मा उभा केला. ज्याचं आश्चर्य आजही क्रीडाविश्व आणि त्याबाहेरच्या विश्वाला वाटल्यावाचून राहात नाही!