लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. स्पर्धेत भारताची एकमेव प्रतिनिधी राहिलेल्या सायनाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चौथ्या मानांकित आणि चीनच्या सिझियान वांगने सातव्या मानांकित सायनावर २१-१७, २१-१० असा सहज विजय मिळवला. सायनाच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
एकतर्फी लढतीत सिझियान वांगने स्मॅश, ड्रॉप, स्लाइस, क्रॉसकोर्ट अशा सर्वच फटक्यांचा प्रभावी उपयोग करत सायनाला निष्प्रभ केले. पहिल्या गेममध्ये वांगने २०-१३ अशी दमदार आघाडी घेतली होती. सायनाने सलग चार गेम पॉइंट वाचवत गेम वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र वांगने शैलीदार फटक्याच्या साह्य़ाने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तर वांगने जोरदार आक्रमण करत सायनाचा धुव्वा उडवला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावत सायनाने जेतेपदांचा दुष्काळ संपवला होता. या जेतेपदासह सायनाला सूर गवसला असे चित्र निर्माण झाले होते. पुरेशा विश्रांतीनंतर सायना ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झाली होती. मात्र उपांत्यपूर्व फेरीतच तिला गाशा गुंडाळावा लागला. सायनाव्यतिरिक्त अन्य भारतीय खेळाडूंना सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. सायनाच्या पराभवामुळे ऑल इंग्लंड स्पर्धेची वारी भारतीय बॅडमिंटनपटूंकरता निराशाजनकच ठरली आहे.