|| धनंजय रिसोडकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमल कुमार यांची स्पष्टोक्ती; खेळाडूंनी स्पर्धेबाबत प्राधान्यक्रम ठरवावा

भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल आता २९ वर्षांची झाल्याने पूर्वीच्या तुलनेत तिचे चापल्य काहीसे कमी झाल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे आता सायनाने स्पर्धाची अचूक निवड करून कारकीर्दीत अधिकाधिक यश मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात सायना ही लढवय्या खेळाडू असल्याने त्यातून मार्ग काढेल, असे परखड मत सायनाचे पूर्वीचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रीय विजेते बॅडमिंटनपटू विमल कुमार यांनी मांडले.

सीसीआयमध्ये रंगलेल्या टाटा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने विमल कुमार यांनी भारताच्या बॅडमिंटनमधील वाटचालीवर दिलखुलास गप्पा मारल्या. ‘‘या वर्षी महिला एकेरीच्या विविध स्पर्धामध्ये पी. व्ही. सिंधू काहीशी कमनशिबी ठरली आहे. त्यामुले खेळाडूंनी स्पर्धाची निवड करताना अत्यंत दक्ष राहणे आवश्यक आहे. प्रत्येक खेळाडूने आपले वर्षभराचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे आखले तरच मानांकन सुधारण्यासह तंदुरुस्तीही टिकवू शकतील. अन्यथा खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य राहणार नाही.  सायना, सिंधूसारख्या अव्वल दर्जाच्या महिला खेळाडू पुढे यायला काहीसा वेळ लागतोय, हे खरे आहे. पण पुरुषात लक्ष्य सेनसारखे खेळाडू पुढे येत असून हे समाधानकारक आहे. बारा वर्षांवरील खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि कौशल्य वाढविण्यावर भर द्यायला हवा.’’

खेळाडूंवर प्रायोजकांचा दबाव

खेळाडूने प्रत्येक स्पर्धेत खेळावे, यासाठी प्रायोजकांचा त्यांच्यावर दबाव असतो. मात्र, तो दबाव कसा हाताळायचा आणि कोणत्या स्पर्धाना प्राधान्य द्यायचे, हे खेळाडूंनी निश्चित करावे. अधिकाधिक स्पर्धामुळे आशियाई देशांतील बहुतांश अव्वल खेळाडूंमध्ये दुखापतींचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. त्या तुलनेत युरोपमधील खेळाडू अधिक प्रभावीपणे स्पर्धाचे नियोजन करतात. माझ्या मते, स्पेनची कॅरोलिन मारिन ही योग्य स्पर्धाची निवड करते. परंतु, याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी खेळाडूंनीच घ्यायचा असतो.

सायनाने ताईविरुद्ध मानसिकता बदलावी

ताई झू यिंगविरुद्ध सायना सर्वाधिक बारा वेळा आणि सातत्याने पराभूत झाली आहे. ताई झू ही निश्चितच दर्जेदार खेळाडू आहे. पण, जो दिवस आपला असेल, त्या वेळी तरी सायनाने तिला हरवायला हवे. त्यामुळे तिच्याविरुद्ध खेळताना सायनाने आपली मानसिकता बदलून सकारात्मकपणे खेळावे, असे विमल कुमार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal
First published on: 04-12-2018 at 01:08 IST