प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा अर्ज नाकारल्यामुळे ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नाराज झाली आहे.
भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पद्मभूषण पुरस्कारासाठी सायनाची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. पण क्रीडा मंत्रालयाने सायनाऐवजी दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला पसंती दिली आहे. सुशील कुमार हाच पद्मभूषण पुरस्कारासाठी योग्य उमेदवार आहे, असे क्रीडा मंत्रालयाचे म्हणणे आहे. ‘‘सुशील कुमारच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे, असे माझ्या कानावर आले. पण क्रीडा मंत्रालयाने माझ्या कामगिरीचा विचार केला नाही. क्रीडा मंत्रालयाच्या नियमांनुसार, दोन पद्म पुरस्कारांमध्ये पाच वर्षांचे अंतर असायला हवे. जर सुशील कुमारच्या नावाची शिफारस होऊ शकते, मग माझ्या नावाची का नाही? मला पद्म पुरस्कार मिळून पाच वर्षे उलटली आहेत, त्यामुळेच मी नाराज झाली आहे,’’ असे सायनाने सांगितले. सायनाला २०१०मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
ती म्हणाली, ‘‘गेल्या वर्षीही याच कारणामुळे माझा अर्ज बाद ठरवण्यात आला होता. त्यामुळे मला या वर्षी पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी सांगण्यात आले होते. म्हणून मी या वर्षी पुन्हा अर्ज दाखल केला होता. पण माझी पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस का करण्यात आली नाही? सुशील कुमारला २०११मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे पाच वर्षांचे अंतर नसतानाही सुशीलला दुसऱ्यांदा पद्म पुरस्कार दिला जात आहे.’’
‘‘२०१०नंतर मी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि बॅडमिंटनमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक देशाला मिळवून दिले. तसेच अनेक सुपर सीरिज स्पर्धाची जेतेपदे आणि क्रमवारीत सर्वोत्तम दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे या पुरस्कारासाठी मी योग्य आहे, असे वाटत होते. पण पुरस्कारासाठी माझी शिफारस न झाल्याचे वाईट वाटत आहे. शुक्रवारी माझे क्रीडा मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. सुशीलची शिफारस करण्यात आली असून आम्ही फक्त तुझ्याबाबतीत लक्ष घालायला सांगू, असे त्यांच्याकडून मला सांगण्यात आले. विशेष बाब म्हणून सुशीलला पुरस्कार देण्यात येत असेल तर मला का नाही? नियमांनुसार विचार केला तर त्यांनी माझ्या नावाची शिफारस करायला हवी होती. सुशील आणि मला दोघांनाही हा पुरस्कार मिळाला तर मी अधिक आनंदी होईन,’’ असे तिने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2015 रोजी प्रकाशित
पद्म पुरस्कार नाकारल्यामुळे सायना नाराज
प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा अर्ज नाकारल्यामुळे ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नाराज झाली आहे.

First published on: 04-01-2015 at 08:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal disappointed by padma award snub