कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवसात भारताच्या सायना नेहवालने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायानाने कोरियाच्या किम ह्यो मिनचा २१-१२, २१-११ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. पुढच्या फेरीत सायनाची गाठ कोरियाच्याच किम गा इयूनशी पडणार आहे. या स्पर्धेसाठी सायनाला पाचवं मानांकन देण्यात आलेलं आहे.

दुसरीकडे स्विस ओपन विजेत्या समीर वर्माला मात्र पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनने समीरचा २१-१५, १६-२१, ७-२१ अशा ३ सेट्समध्ये पराभव केला. तर वैष्णवी रेड्डीला अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने १०-२१, ९-२१ असं हरवलं.

पहिल्या फेरीत सायनाला फारसं आव्हान मिळालंच नाही. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच सायनाने ६-२ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मध्यांतरानंतर आपली आघाडी सायनाने १२-३ अशी वाढवली. या आक्रमक खेळाच्या जोरावर सायनाने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्येही सायनाने आपला आक्रमक खेळ कायम राखत प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. मध्यांतरानंतर किम मिनने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, मात्र सायनाने वेळेतच स्वतःला सावरत दुसरा सेट जिंकत सामन्यात बाजी मारली.