सहा वर्षांनंतर सिंगापूरमध्ये बाजी मारण्यासाठी उत्सुक
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सहा वर्षांपूर्वी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पध्रेच्या कोर्टवर जेतेपदाचा जल्लोष साजरा केला होता. तोच जल्लोष पुन्हा साजरा करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सायना उत्सुक आहे.
गेल्या पाच हंगामांत सायना केवळ तीन वेळा येथे खेळली होती, परंतु तिला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही. या वेळी मात्र हा अडथळा पार करण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे. सामन्याच्या पहिल्याच फेरीत तिच्यासमोर अमेरिकेच्या बवेन झँगचे आव्हान आहे. दुखापतीतून सावरत कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सायनाने स्विस ग्रां. प्रि., इंडियन खुली सुपर सिरीज आणि मलेशिया सुपर सिरीज स्पध्रेच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे सिंगापूरमध्ये तिच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. सायनासह पी. व्ही. सिंधू, एच.एस. प्रणॉय, अजय जयराम आणि किदम्बी श्रीकांत हेही जागतिक क्रमवारीत झेप घेण्याच्या निर्धाराने या स्पध्रेत दमदार कामगिरीसाठी सज्ज आहेत. विश्व अजिंक्यपद स्पध्रेत दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन आँगबुम्रूगंफॅनचे आव्हान आहे. सिंधूने सहा वेळा बुसाननवर विजय मिळवला
आहे.
पुरुष एकेरीत स्विस खुल्या स्पध्रेत जेतेपद पटकावणाऱ्या प्रणॉयला ऑलिम्पिक पात्रता खुणावत असून त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या चेन लाँगचे आव्हान आहे. जयरामला मार्क झ्विब्लेरशी, तर श्रीकांतला चायनीस तैपेईच्या ह्सू जेन हाओशी सामना करावा लागणार आहे. पुरुष दुहेरीत नुकत्याच राष्ट्रीय जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या प्रणव जेरी चोप्रा आणि अक्षय देवळकर या जोडीसमोर चीनच्या लियू चेंग आणि लू काई यांचे आव्हान आहे. महिला दुहेरीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीला कोरियाच्या गो आह रा आणि यू हाई वोन यांचा सामना करेल.