भारताच्या साकेत मायनेनीने पात्रता फेरीतील तिसऱ्या सामन्यात सर्बियाच्या पेड्जा क्रिस्टीनचा ६-३, ६-० असा ५६ मिनिटांत पराभव करून अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेच्या मुख्य फेरीत पहिल्यांदा स्थान पटकावले. मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी मायनेनीला तीन लढती जिंकण्याची आवश्यकता होती आणि त्याने एकही सेट न गमावता विजय मिळवला. पहिल्या दोन लढतींत मायनेनीने स्थानिक खेळाडू मिचेल क्रुगेर व फ्रान्सच्या अल्बानो ओलीव्हेट्टी यांना अनुक्रमे ७-६(६), ६-४ व ७-५, ६-३ असा पराभव केला होता.

याआधी युकी भांब्री आणि सोमदेव देववर्मन यांनी ग्रँडस्लॅम स्पध्रेच्या पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश केला होता. जागतिक क्रमवारीत १४३व्या स्थानावर असलेल्या मायनेनीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या पात्रता फेरीतील तिसऱ्या लढतीत आणि फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या दुसऱ्या पात्रता लढतीत पराभव पत्करावा लागला होता.