सिडनी टेनिस स्पर्धा  : सानिया मिर्झा-मार्टिना हिंगिस जोडीचा सर्वाधिक सामने अपराजित राहण्याचा विक्रम
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने सलग २९ सामने अपराजित राहण्याच्या विक्रमासह शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. सिडनी टेनिस स्पर्धेत सानिया-मार्टिना जोडीने रालुका ओलारु आणि यारोस्लाव्हा श्वेडोव्हा जोडीवर ४-६, ६-३, १०-८ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.
१९९४ मध्ये प्युअटरे रिकान गिगी फर्नाडिझ आणि नताशा व्हेराव्हा जोडीने सलग २८ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम केला होता. २२ वर्षांनंतर सानिया-मार्टिना जोडीने हा विक्रम मोडत दिमाखदार विजय साकारला. या सामन्यात सानिया-मार्टिना जोडीने पहिला सेट गमावला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-मार्टिना जोडीने दोनदा प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदली. पहिली सव्‍‌र्हिस करताना ७६% गुणांची कमाई करीत सानिया-मार्टिना जोडीने दुसरा सेट नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही जोडय़ांनी आपापली सव्‍‌र्हिस राखली. मात्र मोक्याच्या क्षणी ओलारु-श्वेडोव्हा जोडीने दुहेरी चुका केल्या. या चुकीचा फायदा उठवत सानिया-मार्टिना जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केले.