अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर आत्मविश्वास उंचावणारे यश
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने रोमानियाच्या मोनिका निक्यूलेस्क्यूच्या साथीने खेळताना कनेक्टिकट खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला दुहेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पध्रेला सामोरे जाताना तिचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे.
सानियाने निक्यूलेस्क्यू या नव्या साथीदारासह खेळताना पहिले विजेतेपद पटकावले आहे. या जोडीने कॅटरिना बोंडोरेंको (युक्रेन) आणि च्युआंग चिया-जंग (तैवान) जोडीला दीड तास रंगलेल्या अंतिम फेरीत ७-५, ६-४ असे नामोहरम केले.
पहिला सेट अतिशय आव्हानात्मक ठरला, पण तरीही सानिया-निक्यूलेस्क्यू जोडीने ७-५ अशा फरकाने तो जिंकला. मग दुसऱ्या सेटमध्येही प्रतिस्पध्र्याना ६-४ अशा फरकाने हरवून जेतेपदावर नाव कोरले.
याआधी २०१०मध्ये सानिया निक्यूलेस्क्यूच्या साथीने एकमेव स्पर्धा खेळली होती. त्या वेळी या जोडीने वेस्टर्न अँड साऊदर्न खुल्या टेनिस स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
रिओमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा चालू असताना सानियासोबत न खेळण्याचा निर्णय स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगिसने घेतला. या जोडीने गेल्या काही वर्षांत मोठे यश मिळवले होते. हिंगिसपासून दुरावल्यानंतर गेल्या आठवडय़ात चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हासोबत खेळून सानिया सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पध्रेचे अजिंक्यपद मिळवले होते. त्या वेळी अंतिम फेरीत सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीने हिंगिस आणि कोको व्हँडेवेघे जोडीचा पराभव केला होता.
कनेक्टिकट स्पध्रेच्या जेतेपदावर नाव कोरल्यावरही सानिया आणि निक्यूलेस्क्यू यांनी ही जोडी तात्पुरत्या स्वरूपाची असेल, असे स्पष्ट केले आहे. अमेरिकन खुल्या स्पध्रेत ते आपापल्या नियमित जोडीदारांसोबत खेळणार आहेत.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत निक्यूलेस्क्यू म्हणाली, ‘‘मी वानिया किंगसोबत महिला दुहेरीत खेळते. मी सानियाला सिनसिनाटी स्पध्रेच्या वेळी विचारले होते. तिने हो म्हटल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. आम्ही जिंकू शकू, याची मला खात्री होती.
मी बाबरेरासोबत खेळणार आहे. ग्रँड स्लॅम स्पध्रेसाठी जाण्यापूर्वी विजेतेपद मिळणे, हे प्रेरणादायी असते. या आठवडय़ात खेळण्याचा मी अजिबात विचार केला नव्हता. मात्र मोनिकाने मला विचारले की, आपण या स्पध्रेत जिंकू शकतो, असे मला वाटते.
– सानिया मिर्झा