Sania Mirza : Sania Mirza : भारताची एके काळची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही मागच्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. सानियाने २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसह लग्न केलं. मात्र, २०२३ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. सानिया आणि शोएब मलिकला एक मुलगा असून त्याचे नाव इजहान आहे. शोएबने सानियासह तलाक घेतला आणि त्यानंतर लगेचच एका पाकिस्तानी अभिनेत्रीसह निकाह केला. दुसरीकडे सानिया मिर्झा ही दुबईत तिच्या मुलासह राहते. घटस्फोटानंतर सानियाचे नाव भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी याच्यासोबत जोडलं जातंय. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्यावर अजिबात भाष्य केलं नाही, दरम्यान सानियाने तिची परखड मतं एका मुलाखतीत मांडली आहेत.
काय म्हटलं आहे सानिया मिर्झाने?
मासूम मीनावालाच्या पॉडकास्टमध्ये सानिया मिर्झा आली होती. तिने या पॉडकास्टमध्ये तिची परखड मतं मांडली आहेत. तिच्या आयुष्यात एक काळ असाही होता की तिला तिच्या तान्ह्या मुलाला सोडून जावं लागलं होतं. मुलगा इजहान अवघ्या सहा आठवड्यांचा होता आणि तिला दिल्लीला यावं लागलं होतं. माझ्यासाठी हा अनुभव खूपच कठीण होता. मला त्या कालावधीत कधी घरी पोहचेन आणि मुलाला पाहिन असं झालं होतं. जेव्हा अशी वेळ कुठल्याही आईवर येते तेव्हा त्यांना काय वाटत असेल त्या वेदना मी त्या काळात समजू शकले असंही सानियाने म्हटलं आहे.
तो प्रवास माझ्यासाठी खरंच नकोसा होता-सानिया मिर्झा
सानिया मिर्झा म्हणाली की, दिल्लीला जाणारं ते विमान आणि तो प्रवास माझ्यासाठी वेदनादायी होता. मी फक्त रडत होते, मला जायचे नव्हतं. पण मला आता आनंद होतो की, मी त्यावेळी गेले म्हणून मला एक हिंमत मिळाली. सानियाने तिच्या मुलाचे आभारही मानले. सानियाच्या आईने तिला सांगितले की, तो (सानियाचा मुलगा इजहान) फक्त सहा आठवड्यांचा आहे, तू जा त्याला काहीच समजणार नाही आणि ती बरोबर होती. असंही सानियाने या मुलाखतीत सांगितलं.
इजहानच्या जन्मानंतर गोष्टी कशा बदलल्या?
इजहानच्या जन्मानंतर काय काय गोष्टी बदलल्या आणि कशाप्रकारे सामोरे गेली, हे सानियाने या शोमध्ये सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच शोएब मलिक याने एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये शोएबने मुलगा इजहान याच्यासोबत आपले नाते कसे आहे हे सांगितले. हेच नाही तर तो मुलाला भेटण्यासाठी दुबईला प्रत्येक महिन्यात जात असल्याचेही त्याने सांगितले.