तब्बल ४ महिन्यांच्या कालावधीनंतर ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु झालं. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात साऊदम्पटन कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ हा पावसामुळे वाया गेला. करोना विषाणूची भीती लक्षात घेता प्रेक्षकांविना या सामन्याचं आयोजन करण्यात आलं असून आयसीसीचे स्वच्छतेविषयीचे सर्व नियम यात पाळले जात आहेत. परंतू ४ महिने क्रिकेटपासून दुरावलेल्या खेळाडूंसाठी या नवीन नियमांशी जुळवून घेणं फारसं सोपं नसणार आहे.

पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर नाणेफेकीसाठी मैदानात आले. नाणेफेक हरल्यानंतर होल्डरने नेहमीच्या सवयीप्रमाणे स्टोक्ससोबत शेकहँडसाठी हात पुढे केला. स्टोक्सनेही त्याला प्रतिसाद देत हात पुढे केला, पण इतक्यात त्यांना नव्या नियमाबद्दल लक्षात आल्यानंतर काय घडलं ते पाहा…

दरम्यान, साऊदम्पटनमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीसीच्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं होतं. परंतू सामना सुरु होण्यासाठी विलंब झाल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. अखेरीस काहीकाळ पावसाने उसंत घेतल्यानंतर नाणेफेक झाली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजने धडाकेबाज सुरुवात करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. शेनॉन गॅब्रिअलने इंग्लंडच्या डोम सिबलीला भोपळाही न फोडू देता माघारी धाडलं. यानंतर रोरी बर्न्स आणि जो डेनली या फलंदाजांनी बाजू सावरत इंग्लंडला १ बाद ३५ अशी मजल मारुन दिली. यानंतर पावसामुळे पुन्हा एकदा सामना थांबवण्यात आला.