राजकोटच्या निरंजन शहा मैदानावरची कुंद सकाळ. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर भारत आणि इंग्लंडचे संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकणार होते. नौशाद खान आणि त्यांच्या सुनेसाठी मात्र ही सकाळ हुरहूर वाढवणारी होती. जे स्वप्न उराशी बाळगलं, जे स्वप्न दूर जात राहिलं, काहीक्षणी तर ते स्वप्नच राहणार असं वाटलं ते स्वप्न प्रत्यक्षात साकारणार होतं. त्यांचा मुलगा सर्फराझ खानला माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या हस्ते भारताची कॅप देण्यात आली. सर्फराझ भारताचा ३११वा क्रिकेटपटू झाला. ती कॅप सर्फराझच्या डोक्यावर विराजमान होताच नौशाद आणि सर्फराझची पत्नी रोमाना झहूर यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. सर्फराझने संघातल्या सहकाऱ्यांची गाठभेट घेतली आणि तो वडील आणि पत्नीच्या दिशेने झेपावला. कोच आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावणाऱ्या नौशाद यांच्या डोळ्यातले अश्रू त्याने पुसले. नंतर पत्नीच्या डोळ्यातले अश्रू पुसले. दोघांना कडकडून मिठी मारली. आपला मुलगा आता भारताचा झाला आहे याचं अतीव समाधान नौशाद यांच्या देहबोलीत होतं. भरकटू पाहणारं एक स्वप्न आता सत्यात उतरलं होतं. सर्फराझ खानचं पदार्पण ही केवळ एक भावनिक घटना नाही. एका तरुण मुलाला लहान वयात नियतीने फिरवून आणलेल्या रोलरकोस्टरची सफर आहे. कमकुवत हृदयाच्या मंडळींना या सफरीचा वेग कदाचित झेपणार नाही. आशानिराशेचे हिंदोळे तुम्हाला भेलकांडून टाकतील पण तरी तुम्ही ही गोष्ट अनुभवायला हवी.

नौशाद आणि कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशतल्या आझमगढचे. मुंबानगरीत येऊन स्थायिक झाले. प्रचंड गर्दीसाठी प्रसिद्ध अशा कुर्ल्यात सर्फराझचं बालपण गेलं. मुंबईत माणसाला राहायलाच मुळात पुरेशी जागा नाही. त्यामुळे खेळायला मैदानं मोजकीच. पण जी काही मैदानं आहेत तिथे सर्फराझने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली आहे. २००९ मध्ये मुंबईतल्या क्रीडा जगतात सर्फराझ खान हे नाव चमकलं. निमित्तही तसं होतं. १२ वर्षांच्या सर्फराझने मुंबईतल्या प्रतिष्ठेच्या हारिस शिल्ड स्पर्धेत ४३९ धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. सचिन तेंडुलकरचा ३४६ धावांचा विक्रम मोडल्याने सर्फराझच्या नावाला वलय प्राप्त झालं. आपल्या कामगिरीइतकंच त्याचं परिमाणही महत्त्वाचं असतं. आझाद मैदानातलं जॉन ब्राईट क्रिकेट क्लब ही सर्फराझची कर्मभूमी. याच मैदानात शेकडो तास घाम गाळून सर्फराझने बॅटिंगची धुळाक्षरं गिरवली आहेत. वडीलच कोच असल्याने शिस्त ओघाने आलीच.

youth dies after suffering heart attack
पिंपरी: क्रिकेट खेळताना तरुणाला हृदविकाराचा झटका; ‘तो’ क्रिकेट चा सामना ठरला शेवटचा!
kolkata knight riders faces sunrisers hyderabad in ipl 2024 qualifier 1
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: ‘क्वॉलिफायर१’च्या सामन्यात आज कोलकातासमोर हैदराबादचे आव्हान, अंतिम फेरीचे लक्ष्य!
Man of the match award dedicated to Yash Dayal Faf du Plessis sport news
डय़ूप्लेसिसकडून सामनावीराचा पुरस्कार यश दयालला समर्पित!
Marlingodavari Titans bought Nitish Kumar Reddy for Rs 15.6 lakh for Andhra Premier League 2024 season
IPL कामगिरीमुळे २० वर्षीय भारतीय खेळाडूचे उजळले नशीब, ‘या’ लीगचा ठरला सर्वात महागडा खेळाडू
Punjab Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
PBKS vs RCB : रजत पाटीदारने रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Yuzvendra Chahal 1st Indian Bowler To Take 350 T20 Wickets
DC vs RR: युजवेंद्र चहलने रचला इतिहास, टी-२० मध्ये भारतासाठी ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
Richard Gleeson debuts in IPL
Richard Gleeson : पर्दापणाच्या सामन्यात रोहित, विराट आणि ऋषभला बाद करणारा शिलेदार आता धोनीसेनेत
Jason Gillespie Gary Kirsten
कर्स्टन, गिलेस्पी पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक

दोनच वर्षात नियतीने जोरदार वळण घेतलं आणि सर्फराझचं नाव वयचोरी प्रकरणात घेतलं गेलं. सर्फराझचं वय अधिक आहे पण ते कमी दाखवण्यात आलं आहे असा आरोप झाला. हाडांची प्राथमिक चाचणी झाली, त्यात त्याचं वय अधिक असल्याचं दिसलं. उभरत्या वयातल्या मुलाला याचे परिणाम किती माहिती असतील कल्पना नाही पण घरच्यांना गांभीर्य कळलं. सुदैवाने प्रगत चाचणी झाली, त्यात सर्फराझचं वय जेवढं कागदोपत्री होतं तितकंच असल्याचं स्पष्ट झालं. या काळात मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात आली.

धावा होत होत्या, प्रसिद्धी मिळत होती. डोक्यात हवा जाण्याचा हा काळ असतो. युकेमध्ये शिबीर आटोपून परतलेल्या १२वर्षांच्या सर्फराझला एमसीएच्या कॅम्पमधून बाहेर करण्यात आलं. २०१४ मध्ये सर्फराझने U19 वर्ल्डकपमध्ये आपल्या बॅटची ताकद दाखवली. मात्र पुढच्याच वर्षी २०१५ मध्ये U19 चॅम्पियनशिपच्या मॅचदरम्यान निवडसमिती सदस्यांच्या दिशेने आक्षेपार्ह हावभाव केल्याने सर्फराझवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. काही दिवसांनंतर मुंबई रणजी संघातूनही त्याला डच्चू देण्यात आला. ट्वेन्टी२० प्रकारात जगभरात प्रसिद्धीस पावलेला सूर्यकुमार यादव आणि सर्फराझ यांच्या मॅच फी रोखण्यात आल्या होत्या.

सर्फराझच्या बाबतीत यशापयश, आशानिराशा, सुखदु:ख हे संगीत खुर्चीप्रमाणे येत गेलं. २०१५ मध्ये सर्फराझ आयपीएल खेळला. या स्पर्धेत खेळणारा सगळ्यात लहान वयाचा खेळाडू ठरला. विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स आणि ख्रिस गेल अशा मातब्बर लोकांच्या बरोबरीने सर्फराझ खेळला. चौथ्या सामन्यात खुद्द विराट कोहलीने सर्फराझची दखल घेतली. सर्फराझने राजस्थानविरुद्धच्या लढतीत २१ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. सर्फराझ चौफेर फटकेबाजी करुन परतत असताना कोहलीने दोन्ही हात जोडून नव्या भिडूला सलाम केला. तो व्हीडिओ युटयूबवर आजही पाहिला जातो. त्या घटनेनंतर सर्फराझचं भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न पाहायला १० वर्ष जावी लागतील असं कोणालाही वाटलं नसेल.

पुढच्याच वर्षी सर्फराझने पुन्हा एकदा U19 वर्ल्डकप गाजवला. आरसीबीने त्याला रिटेन म्हणजे संघात कायम ठेवलं. भारताकडून न खेळलेल्या खेळाडूला ताफ्यात राखण्याची ती पहिलीच वेळ होती. मात्र समाधानकारक फिटनेस नसल्यामुळे आरसीबीने सर्फराझला अंतिम अकरातून बाजूला केलं. विराट कोहलीसाठी फिटनेस हा परवलीचा शब्द आहे. तुम्हाला खेळायचं असेल तर सर्वोत्तम फिटनेस हवा. तो स्वत:च यासंदर्भात एक मापदंड झाला आहे. २०१७ मध्ये दुखापतीमुळे सर्फराझला आयपीएल हंगामच खेळता आला नाही.

मुंबईत गोष्टी मनासारख्या होत नसल्याने सर्फराझने उत्तर प्रदेश संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानेही फार काही साधलं नाही आणि सर्फराझ मुंबईकडे परतला. मुंबईकडून खेळण्यासाठी पुन्हा पात्र ठरण्यासाठी त्याला कूलिंग ऑफ पीरियड पार करावा लागला. त्याकाळात वडिलांबरोबर त्याने बॅटिंगवर कसून काम केलं. २०१९-२० हंगामात सर्फराझने मुंबईकडून खेळताना त्रिशतकी खेळी केली. तेव्हापासून सर्फराझ डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओततो आहे. २०२१-२१ रणजी हंगामात तर सर्फराझने तब्बल ९८२ धावा केल्या. सलग दोन वर्ष रणजी हंगामात ९००पेक्षा जास्त धावा त्याच्या नावावर आहेत. एवढं चांगलं खेळूनही भारतीय संघात निवड होत नसेल तर खेळाडूंनी रणजी करंडक स्पर्धेत का खेळावं असा सवाल सुनील गावस्कर यांनी केला होता. गावस्करांचे शब्द होते, ‘सर्फराझ १००च्या सरासरीने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा करतो आहे. त्याला भारतीय संघात स्थान मिळायला हवं. सर्फराझ क्रिकेट खेळण्यासाठी फिट आहे. निवडसमितीला सडपातळ खेळाडू हवे असतील तर त्यांनी फॅशन शो मध्ये शोधावेत. काही मॉडेल्सची निवड करावी. निवड ही धावांच्या बळावर व्हायला हवी, वजनावर नाही’.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा करत असताना आयपीएलमध्ये सर्फराझचं पंजाब ते दिल्ली असं संक्रमण झालं. दिल्लीची टीम युवा खेळाडूंवर विश्वास ठेवणारी. रिकी पॉन्टिंगसारखा कोच मदतीला आहे. पण सर्फराझला नियमित संधी मिळू शकली नाही. डोमेस्टिकमधल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर सर्फराझ इंडिया ए साठी नियमित खेळू लागला. इंग्लंडची मालिका सुरू असतानाच इंग्लंड लायन्सचा संघ भारतात दाखल झाला. त्यांच्याविरुद्ध खेळणाऱ्या इंडिया ए संघात सर्फराझ होता. अहमदाबादला पहिल्या सामन्यात त्याने ९६ धावांची आक्रमक खेळी केली. दुसऱ्या सामन्यात ५५ धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यात १६१ धावांची दणदणीत खेळी केली. एवढं पुरेसं होईल असं तुम्हाला वाटू शकतं. पण निवडसमितीने विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारची निवड केली. हैदराबाद कसोटीनंतर के.एल.राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाले आणि सर्फराझची भारतीय संघात निवड झाली. समीकरणं लक्षात घेऊन विशाखापट्टणम कसोटीत रजत पाटीदारने पदार्पण केलं. सर्फराझ ज्या पद्धतीने मुंबईसाठी धावा करतोय तेच काम रजत मध्य प्रदेशसाठी करतोय. १५सदस्यीय संघात निवड होऊनही स्वप्न दूर राहणार असं चित्र होतं कारण विराट कोहली उर्वरित तीन सामन्यांसाठी परतेल अशी आशा होती. श्रेयस अय्यर आणि राहुल फिट असतील तर सर्फराझची निवड शक्य नव्हती. पण नियतीने जागा तयार केली. कोहली-अय्यर-राहुल तिघेही खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आणि सर्फराझचा भारताकडून खेळण्याचा मार्ग सुकर झाला.

पण गुरुवारच्या दिवसाचा घटनाक्रम पाहा. सर्फराझच्या बाबतीत काहीच सहजसोपं नाही. नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची अवस्था ३३/३ अशी झालेली. सर्फराझ फलंदाजीला तय्यार होता. पण लेफ्टराईट कॉम्बिनेशनचा विचार करुन अनुभवी रवींद्र जडेजाला पाठवण्यात आलं. कर्णधार रोहित शर्मा आणि जडेजाने २०४ धावांची भागीदारी रचली. शतकानंतर रोहित बाद झाला आणि सर्फराझ मैदानात उतरला. कॅमेरा त्याच्या घरच्यांवर फोकस झाला. पहिली धाव घेतल्यानंतर घरच्यांनी आकाशाकडे पाहून त्याचे आभार मानले. पुढच्या अर्धा पाऊण तासात सर्फराझने नेमकी ताकद दाखवली. फिरकीची त्याला भीती वाटत नाही. स्ट्राईक रोटेट करण्यात तो वाकबगार आहे. मोठ्या नावांचं त्याला दडपण येत नाही. ४१ वर्षांचा जेम्स अँडरसन आणि भंबेरी उडवणाऱ्या वेगाने गोलंदाजी करणारा मार्क वूड यांचा सर्फराझने समर्थपणे सामना केला. सर्फराझ मैदानात आला तेव्हा जडेजा ८४ धावांवर खेळत होता. सर्फराझने झटपट अर्धशतक पूर्ण केलं. पदार्पणात शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी बाहेर निघाली. पण हाय रे दैवा. नशीब आडवं आलं. जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर होता. आपल्या अनुभवी साथीदाराचं शतक पूर्ण व्हावं यासाठी सर्फराझने जडेजाला होकार दिला. सर्फराझ क्रीझमधून बाहेर पडला. जडेजाने माघार घेतली. मार्क वूडने स्टंप्सच्या दिशेने चेंडू फेकला आणि बेल्स उडाल्या. त्याचक्षणी ड्रेसिंगरुममध्ये कर्णधार रोहित शर्माने संतापाच्या भरात शिव्या देत कॅप भिरकावून दिली. शतकही झालं नाही आणि पदार्पणात दमदार खेळणाऱ्या मुलाची विकेट अशी जावी याची बोच रोहितच्या कृतीतून दिसली. वूडच्या थ्रो ने यष्ट्यांचा वेध घेताच जडेजा अवाक झाला. सर्फराझलाही क्षणभर कळेना काय करावं. घरचे निराश होऊन खाली बसले. पण स्वत: कोच असलेल्या नौशाद यांनी सावरलं आणि सर्फराझच्या खेळीचं टाळ्या वाजवून कौतुक करायला सुरुवात केली. सर्फराझ परतू लागताच ड्रेसिंगरुममधल्या प्रत्येकाने उभं राहून त्याचं कौतुक केलं.

सर्फराझ खान किती कसोटी खेळेल, किती धावा करेल माहिती नाही. नियतीचं ठरलं असेलच. पण गुरुवारची सकाळ देशाच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक नौशाद आणि सर्फराझला बळ देणारी होती. वेळ लागेल पण संधी मिळेल. कौतुकाबरोबरीने टीकेचे, ट्रोलिंगचे, निराशेचे दिवस येतील. धडपडायला होईल, रस्ता दिसणार नाही असा अंधार होईल पण कुठूनतरी प्रकाशाची वाट निर्माण होईल. चुका होतील, त्या सुधाराव्या लागतील. काय करायचं, काय करायचं नाही हे ठरवावं लागेल. पैसा, प्रसिद्धी मिळाल्यावर त्याने हरखून न जाता नम्र राहणं शिकायला हवं. आपण व्यवस्थेपेक्षा मोठे नाही हे अंगी बाणवायला हवं. सर्फराझची ही सफर आपल्यासाठीही तितकीच अंजन घालणारी. नेक्स्ट बिग थिंग म्हणता म्हणता विजनवासात लोटलं जाणाऱ्या त्या युवा मंडळींचं काय होत असेल याचाही विचार व्हायला हवा. सर्फराझची सफर संधी नावाच्या लपंडावाची साक्ष देणारी. संधी कधी अवचित येईल सांगता येत नाही. संधीसाठीची प्रतीक्षा तुमचा संयम पाहते. आपल्यापेक्षा कमी गुणवान माणसांना संधी मिळताना पाहणं त्रास देऊ शकतं. सर्फराझची सफर पल्लेदार व्हावी अशीच आपली इच्छा. सर्फराझने संधीला दखल घ्यायला भाग पाडलं. तुम्हाआम्हाला कोणी रोखलंय?