बासेल : भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने वर्चस्वपूर्ण कामगिरी सुरू राखताना रविवारी स्विस खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील (सुपर ३०० दर्जा) पुरुष दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या मानांकित सात्विक-चिराग जोडीने चीनच्या रेन शिअँग यू आणि चान क्विअँग जोडीवर २१-१९, २४-२२ अशी सरळ गेममध्ये मात केली. भारतीय जोडीने हा सामना ५४ मिनिटांत जिंकला. सात्विक-चिराग जोडीचे हे नव्या हंगामातील पहिले जेतेपद ठरले. गेल्या आठवडय़ात झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेत सात्विक-चिरागला दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, स्विस स्पर्धेत त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ केला.

स्विस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी सायना नेहवाल (२०११, २०१२), किदम्बी श्रीकांत (२०१५), एचएस प्रणॉय (२०१६) आणि पीव्ही सिंधू (२०२२) यांनी एकेरीत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. सात्विक-चिरागला यंदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यांचे तीन सामने तीन गेमपर्यंत रंगले होते. अंतिम फेरीत दोनही जोडय़ांनी झुंजार खेळ केला, परंतु दोन्ही गेममध्ये मोक्याच्या क्षणी सात्विक-चिरागने आपला खेळ उंचावत जेतेपद मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satwik chirag win swiss open badminton title zws
First published on: 27-03-2023 at 02:02 IST