राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्माने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत सिंगापूरच्या लोह कीन येऊ याचा चित्तथरारक लढतीत पराभव करून हैदराबाद खुल्या स्पर्धेच्या पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले.

मध्य प्रदेशच्या २६ वर्षीय सौरभने ५२ मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत ४४व्या स्थानी असलेल्या लोह कीनचा २१-१३, १४-२१, २१-१६ असा पराभव केला. मात्र महिलांच्या दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या भारताच्या अव्वल मानांकित जोडीला अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या जोडीकडून हार पत्करावी लागली.

सौरभने दमदार खेळ करत सुरुवातीलाच ६-२ अशी आघाडी घेतली होती, ती पुढे ११-४ अशी नेत पहिला गेम जिंकला. दुसरा गेम कीनने जिंकल्यानंतर निर्णायक गेममध्ये  ११-१० अशा स्थितीनंतर सौरभने गुणांची लयलूट करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.  अश्विनी-सिक्की रेड्डी जोडीला अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या बेक हा ना आणि जंग यूंग इयून यांच्याकडून १७-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.