कोरिया खुली स्पर्धेपाठोपाठ मलेशियन खुल्या स्पर्धेतही सायना नेहवालला विजेतेपदाला गवसणी घालण्यात अपयश आले आहे. उपांत्य फेरीत सायनाला १२ व्या मानांकित झू यिंग ताई हिने पराभूत करत अंतिम फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झालेल्या सायनाला झू हिचा बचाव भेदण्यात अपयश आले. झू हिने उपांत्य फेरीत सायनावर २२-२०, २१-१४ असा ३५ मिनिटांत विजय मिळवला.
झू हिने या सामन्यात जोरदार परतीचे फटके मारत सायनाला हैराण केले, त्याचबरोबर नेटजवळही सरस खेळ करत तिने सायनाला विजयापसून वंचित ठेवले. झू हिने सायनाला दुसऱ्यांदा पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी झू हिने सायनाला २०११ साली डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभूत केले होते.
पहिल्या गेममध्ये सायना सुरुवातीला १-३ अशी पिछाडीवर होती, पण त्यानंतर आक्रमक खेळ करत सायनाने ५-४ अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर झालेल्या काही चुका सायनाला भोवल्या आणि झू हिने ११-६ अशी आघाडी घेतली. सायनाने त्यानंतर सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो अयशस्वी ठरला. पहिला गेम जिंकल्यावर झू हिचे मनोबल कमालीचे उंचावले होते आणि तिने दुसरा गेम सहजपणे जिंकत अंतिम फेरी गाठली.