हैदराबादमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर तेथील राज्य सरकारने खेळाडूंच्या सुरक्षिततेचे आश्वासन दिल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अन्यत्र कुठेही हलविण्यात येणार नाही. हा सामना हैदराबादमध्येच होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांनी हैदराबादमध्ये खेळण्याविषयी चिंता व्यक्त केली होती, पण बीसीसीआयने त्यांना चोख सुरक्षाव्यवस्था पुरविण्याचे आश्वासन दिले आहे.
      बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा फोन आल्यानंतर मी केंद्रीय गृहसचिवांशी फोनवरून चर्चा केली. ते हैदराबादमध्येच असून राज्य सरकारचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना चोख बंदोबस्त पुरवला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे कसोटी सामना हैदराबादमध्येच खेळवला जाईल.
-राजीव शुक्ला,
बीसीसीआयचे उपाध्यक्ष

      आम्ही वेळीच योग्य ती काळजी घेत असतो. सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला आम्ही घेत आहोत. पण आम्ही सध्या चेन्नई कसोटीवरच लक्ष केंद्रित केले आहे. खेळाडूंना कडक बंदोबस्त पुरविण्यात आल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे हैदराबाद येथील दुसरा कसोटी सामना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल.’’
-जेम्स सदरलँड,
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य     कार्यकारी अधिकारी