ब्लोमफोंटेन : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची निवड तोंडावर असताना फलंदाज हनुमा विहारीने आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या तिसऱ्या अनौपचारिक कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार विहारीने (१७० चेंडूंत ६३ धावा) अर्धशतकी खेळी केली.

विहारीला न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. याऊलट त्याला भारत ‘अ’ संघाकडून चार दिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आले. विहारीने दुसऱ्या अनौपचारिक कसोटीच्या दोन्ही डावांत (५४ आणि नाबाद ७२) अर्धशतके झळकावली होती. त्याने तिसऱ्या सामन्यातही चांगली कामगिरी सुरू ठेवली.

विहारीला इशान किशनची (१४१ चेंडूंत नाबाद ८६) उत्तम साथ लाभल्याने दुसऱ्या दिवसअखेर भारताची ६ बाद २२९ अशी धावसंख्या होती. त्याआधी आफ्रिका ‘अ’ संघाचा पहिला डाव २६८ धावांत आटोपला. सलामीवीर सॅरेल एव्र्हीने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. भारताच्या दीपक चहरने चार, तर नवदीप सैनीने तीन गडी बाद केले.