संघर्ष तिच्या पाचवीलाच पूजलेला, कधीच टळलेला नाही, खासगी आयुष्य असो किंवा व्यावसायिक, संघर्ष करूनच ती इथपर्यंत आली आणि संघर्षांलाच प्रेरणा मानून तिने सलग चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं. अंतिम फेरीत पहिला सेट जिंकल्यावर ती काही मिनिटांतच विजेतेपद पटकावेल, असे साऱ्यांनाच वाटत होते. कारण बिनतोड सव्‍‌र्हिस आणि जोरदार परतीचे फटके तिच्या भात्यात होते.पण समोर अव्वल मानांकित खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारली. सेट गमावल्यावर तिने उपविजेतेपदाच्या भाषणाची तयारी मनोमन सुरू केली, पण त्यानंतर आयुष्यातला संघर्ष तिला पुन्हा एकदा आठवला आणि ती नव्याने पेटून उठली. १-१ अशा बरोबरीनंतर तिने पुन्हा नव्याने संघर्षांला सुरुवात केली आणि वयाच्या तिशीतही युवा खेळाडूंना लाजवेल असा दिमाखदार खेळ करत सेरेना विल्यम्सने चौथ्यांदा स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. अव्वल मानांकित विक्टोरिया अझारेन्काने कडवी झुंज दिली, पण अखेर ती व्यर्थच ठरली. सेरेनाने अटीतटीच्या लढतीत अझारेन्कावर ६-२, २-६, ७-५ असा पराभव केला. या विजेतेपदामुळे एकाच वर्षी विम्बल्डन, ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी व्हीनस आणि स्टेफी ग्राफनंतरची तिसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. सेरेनाचे कारकिर्दीतले हे पंधरावे ग्रॅण्ड स्लॅम ठरले आहे.
आपल्याच घरच्या प्रेक्षकांसमोर एखाद्या राजकन्येसारखी ती मैदानात अवतरली. पण खांद्यावरची बॅग ठेवून जेव्हा कोर्टवर उतरली तेव्हा एखाद्या मर्दानीसारखी खेळली आणि जिंकलीही. पहिल्या सेटमध्ये संपूर्ण ताकद लगावत तिने अझारेन्काला हतबल करून सोडले होते. आपल्या सव्‍‌र्हिस तिने अझारेन्काला मोडू दिल्या नाहीत, तर अझारेन्काची सव्‍‌र्हिस जोरदार परतीच्या फटक्यांच्या जोरावर मोडीत काढली. पहिला सेट ६-२ असा जिंकल्यावर सेरेना सहज विजेतेपदावर कब्जा करेल, असे वाटले होते. पण अव्वल क्रमांकावर असलेली अझारेन्का काही हार मानण्यातली नव्हती. दुसऱ्या सेटमध्ये तिने सेरेनाची मक्तेदारी मोडीत काढली. दुसऱ्या सेटमध्ये लौकिकाला साजेसा खेळ करत तिने सेरेनाला ६-२ असे पराभूत केले आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
दोघींची बरोबरी झाल्याने तिसरा सेट रंगतदार होणार, असे वाटत होते आणि तसेच झाले. तिसऱ्या सेटमध्ये सेरेना आणि अझारेन्का यांनी तोडीस तोड खेळ केला, जिंकण्याची ईर्षां त्या दोघींमध्येही होती, पण शेवटी अनुभवाची धनी असलेल्या सेरेनाने टाय ब्रेकरमध्ये ७-५ असा विजय मिळवला आणि तिला काय करावे, काय नाही, हे सुचतच नव्हते. तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. संपूर्ण कोर्टभर उडय़ा मारत तिने आनंद साजरा केला.

सेरेनाचे ग्रॅण्ड स्लॅम विजय
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा :
१९९९, २००२, २००८, २०१२.
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : २००३
विम्बल्डन : २००२, २००३, २००९, २०१०, २०१२.
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : २००३, २००५, २००७, २००९, २०१०.

सेरेना सार्वकालीन महान खेळाडू आहे. तिने खेळाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. तिच्याविरुद्ध झालेल्या पराभवातून मी खूप काही शिकले आहे. सेरेनाविरुद्धचा सामना मला सर्वोत्तम प्रदर्शनाची प्रेरणा देतो. खेळात सुधारणा होण्याच्या दृष्टीने हा सामना उपयोगी ठरतो. या सगळ्यासाठी मी तिची आभारी आहे.
माझा खेळ, शारीरिक क्षमता तसेच व्यक्तिमत्त्व या सगळ्या पातळ्यांवर माझ्या कामगिरीची दर्जा उंचावेल याची खात्रीच जणू सेरेना घेते. सेरेना महिला खेळाडूंमधील काही मौल्यवान खेळाडूंपैकी एक आहे. आजचा सामना अटीतटीचा झाला. निकाल बाजूने लागण्याची संधी मला भविष्यात मिळू शकते.
– व्हिक्टोरिया अझारेन्का

मी ३० वर्षांची असूनही मला आता तरुण असल्यासारखे वाटतेय. आताइतके तंदुरुस्त मला कधीच वाटले नव्हते. मला प्रचंड उत्साही वाटत आहे. विजयाची भूक मला जाणवते आहे. या विजयानंतरही मला पुढची ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळण्याची इच्छा आहे. त्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करावी असे मला मनापासून वाटते आहे. आणखी जेतेपदे माझ्या नावावर होऊ शकतात.
आजच्या विजयाने मी सुखावले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर ग्रँड स्लॅम जेतेपद अविस्मरणीय आहे. दुखापतीमुळे १० ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये मी सहभागी होऊ शकले नाही. पण त्याबाबत मी काहीच करू शकत नाही. मी त्या स्पर्धात सहभागी झाले असते तर आणखी पाच जेतेपदे निश्चित मिळवली असती. स्टेफी ग्राफच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाच्या जवळपासही मी कधी पोहोचेन असे वाटले नव्हते. मी सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आणि विम्बल्डनवर आणखी काही सामने खेळले तर चांगले होईल. वर्षांला दोन अशा पद्धतीने जेतेपदे मिळवण्याचा माझा मानस आहे. कारकीर्द संपल्यानंतर माझे टेनिसला असणारे योगदान काय असेल याचा मी विचार करते. मला इतिहास घडवायचा आहे.
– सेरेना विल्यम्स