सेरेनाचे त्रिशतक!

विम्बल्डन स्पध्रेत ८२ विजय नावावर असलेल्या ३४ वर्षीय सेरेनाला स्टेफी ग्राफचा २२ ग्रँडस्लॅम जेतेपदाचा विक्रम खुणावत आहे

सेरेना विल्यम्स

जगातील सर्वोत्तम महिला टेनिसपटूंपैकी एक आणि अनेक विक्रम नावावर असणाऱ्या सेरेना विल्यम्सने रविवारी विम्बल्डन टेनिस स्पध्रेत आणखी एक मैलाचा दगड गाठला. गतविजेत्या सेरेनाने तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या अ‍ॅनिका बेकचा ६-३, ६-० असा सहज पराभव करून तीनशेव्या ग्रँडस्लॅम विजयाची नोंद केली. दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा (३०६) हिच्यानंतर हा पल्ला सर करणारी सेरेना पहिली खेळाडू आहे.

विम्बल्डन स्पध्रेत ८२ विजय नावावर असलेल्या ३४ वर्षीय सेरेनाला स्टेफी ग्राफचा २२ ग्रँडस्लॅम जेतेपदाचा विक्रम खुणावत आहे, तर सातव्यांदा ती विम्बल्डन जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे. बेकविरुद्धच्या लढतीत सेरेनाने २५ बिनतोड सव्‍‌र्हिससह अवघ्या ५१ मिनिटांत विजय मिळवला. पुढील फेरीत तिच्यासमोर रशियाच्या स्व्हेत्लाना कुझनेत्सोव्हाचे आव्हान आहे. कुझनेत्सोव्हाने अमेरिकेच्या २३ वर्षीय स्लोआन स्टिफन्सचा ६-७(७/१), ६-२, ८-६ असा पराभव केला.

पुरुष गटात जो-विल्फ्रेड त्सोंगा व निक किर्गिओस यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. अमेरिकेच्या जॉन इस्नेरने तिसऱ्या फेरीत फ्रान्सच्या त्सोंगाला ४ तास २४ मिनिटे झुंजवले. या वर्षांत दीर्घकाळ सामन्याचा विक्रम त्सोंगा व इस्नेर यांनी केला. त्सोंगाने ०-२ अशा पिछाडीनंतर ६-७(३/७), ३-६, ७-५(७/५), ६-२, १९-१७ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाच्या किर्गिओसलाही फेलिसियानो लोपेझविरुद्ध दोन तास ४२ मिनिटे संघर्ष करावा लागला. किर्गिओसने हा सामना ६-३, ६-७(२/७), ६-३, ६-४ असा जिंकला. चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डिचने ६-३, ६-४, ४-६, ६-१ अशा फरकाने जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर व्हेरेव्हचा २ तास ३९ मिनिटांत पराभव केला.

महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगिस या जोडीने   एरी होजुमी व मियू कांटो या जपानच्या जोडीचा ६-३, ६-१ असा  पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

हे खरे आहे? मला याची कल्पनाच नव्हती. हा विक्रम ऐकून आनंद झाला.

– सेरेना विल्यम्स

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Serena williams win makes more history at wimbledon

ताज्या बातम्या