कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजला पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोखण्यासाठी बांगलादेशचा संघ सज्ज झाला आहे. मात्र हे आव्हान पेलताना त्यांना अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनची साथ लाभणार नाही.
 टाचेला झालेल्या दुखापतीमुळे शकीब पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नाही. बांगलादेशने यावर्षी मार्चमध्ये भारत आणि श्रीलंका या बलाढय़ संघांना नमवत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या अनुभवाचा आम्ही निश्चित फायदा उठवू असे बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमने सांगितले. बऱ्याच कालावधीनंतर आम्ही एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहोत. वेस्ट इंडिज एक चांगला संघ आहे, त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न असेल त्याने पुढे सांगितले.