ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारत दौऱयावर असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारतात मिळणाऱया आदरातिथ्याचे कौतुक केल्याने पाकिस्तानात त्याच्यावर टीका केली जात आहे. पाक संघाचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी आफ्रिदीच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत अशी वक्तव्ये करताना लाज कशी वाटत नाही? असा सवाल केला आहे.

मायदेशापेक्षा अधिक प्रेम आम्हाला भारतात अनुभवायला मिळते आणि म्हणूनच भारतात कधीही सुरक्षेचा धोका जाणवत नाही, असे मत पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले होते. त्यापाठोपाठ पाक क्रिकेटपटू शोएब मलिकनेही भारत आपल्याला नेहमी सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले होते. त्याविरोधात जावेद मियांदाद यांनी संताप व्यक्त करत पाक क्रिकेटपटूंवर टीका केली.

मियांदाद म्हणाले की, आफ्रिदीचे बोलणे ऐकून मला धक्का बसला आणि दुखावलो गेलो. पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी गेला आहे म्हणजे यजमानांची स्तुती करायलाच हवी असा नियम नाही. भारताने आपल्याला काय दिले? गेल्या पाच वर्षात त्यांनी पाक क्रिकेटसाठी कोणती मदत केली? असे सवाल देखील मियांदाद यांनी उपस्थित केले. आफ्रिदीने केलेल्या वक्तव्याची पाक क्रिकेट बोर्डाने दखल घेण्याची गरज असून, विदेशात गेल्यावर माध्यमांशी कसे बोलावे याचे धडे क्रिकेटपटूंना देण्याची गरज असल्याचेही मियांदाद म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मियांदाद यांच्याप्रमाणेच पाक संघाचा माजी प्रशिक्षक मोहसीन खान यानेही आफ्रिदीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आफ्रिदीला भारतप्रेम महागात पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. कारण, भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळत असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी आफ्रिदीला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका स्थानिक वकिलाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. आफ्रिदीने केलेले वक्तव्य हे पाकिस्तान विरोधी असून, त्याने देशाची माफी मागावी असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.