पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत मॅथ्यू रेनशॉने दमदार कामगिरी करून सलामीसाठीचे आपले नाणे खणखणीत केले आहे, परंतु २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत शॉन मार्शने डेव्हिड वॉर्नरसोबत सलामीला यावे, अशी इच्छा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘रेनशॉने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे; परंतु भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शॉन मार्शने सलामीला यावे, हा मोह मी आवरू शकत नाही,’’ अशी प्रतिक्रिया वॉ याने समाजमाध्यमांवर चाहत्यांशी संवाद साधताना दिली.

‘‘मार्शचे विक्रम बोलके आहेत आणि सलामीवीर म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. तो भारतात सलामीसाठी सज्ज आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगमुळे तेथील परिस्थितीची त्याला चांगली जाण आहे. ऑस्ट्रेलियन संघालाही त्याचा फायदा होईल. त्यामुळे मार्श आणि वॉर्नर यांना सलामीला आलेले पाहायला आवडेल,’’ असे वॉ म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मार्शच्या बोटाला दुखापत झाली होती. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या दुखापतीनंतर मार्शचा पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ३३ वर्षीय मार्शची उपखंडातील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने कसोटीत जवळपास ७८च्या सरासरीने धावा केल्या असून त्यात श्रीलंकेत केलेल्या दोन शतकांचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaun marsh should open in india waugh
First published on: 10-02-2017 at 02:41 IST