शॉन व्हाइटने स्नोबोर्ड क्रीडा प्रकारात पुरुष गटामध्ये बुधवारी सुवर्णपदक पटकावले आणि हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात अमेरिकेच्या ‘सुवर्णशतका’ची नोंद झाली. अमेरिकेच्या चार्ल्स जेवस्ट्रोवने  १९२४ मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमधील स्पीड स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक हे अमेरिकेचे पहिले सुवर्णपदक होते. दरम्यान, वादळी वाऱ्याचा तडाखा सलग पाचव्या दिवशी खेळाडूंना व संयोजकांनाही बसला.

उत्कंठापूर्ण शर्यतीत ३१ वर्षीय व्हाइटने शेवटच्या फेरीत अप्रतिम कौशल्य दाखवत विजेतेपदावर मोहोर उमटवली. त्याने यापूर्वी २००६ व २०१० मध्ये अजिंक्यपद मिळवले. मात्र २०१४ मध्ये त्याला पदकापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळेच यंदा त्याने कसून तयारी केली होती. जपानच्या आयुमु हिरानोने रौप्यपदक मिळवले, तर ऑस्ट्रेलियाच्या लुकास क्लॅपरला कांस्यपदक मिळाले. व्हाइटने सांगितले, ‘‘देशाला शंभरावे सुवर्णपदक मिळवल्याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे. गतवेळी मला हॅट्ट्रिक साधता आली नव्हती. हे अपयश क्लेशदायक होते. यंदा सुवर्णपदक पुन्हा खेचून आणण्याचेच ध्येय होते आणि त्यात यशस्वी झाल्याचा समाधान आहे.’’

पुरुषांच्याच दहा किलोमीटर क्रॉसकंट्री (नॉर्डिग) शर्यतीत जर्मनीच्या एरिक फ्रेन्झेलने सुवर्णपदक जिंकले. त्याने हे अंतर २४ मिनिटे ५१.४४ सेकंदात पार केले. जपानच्या अकितो वाताबेला रौप्य, तर ऑस्ट्रेलियाचा स्कॉट जेम्सला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या एक किलोमीटर स्पीड स्केटिंग प्रकारात नेदरलँड्सच्या जोरियन तेरमोर्सने सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर एक मिनिट १३,५६ सेकंदात पूर्ण केले. हे अंतर एक मिनिट ८२ सेकंदात पार करणाऱ्या नाओ कोदेरा या जपानच्या खेळाडूला रौप्यपदक मिळाले. तिची सहकारी मिहो ताकाजीने कांस्यपदक मिळवले.