नव्या पर्वाची दिमाखदार सुरुवात करताना शिखर धवन आणि मुरली विजय यांनी बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत भक्कम सलामी देत मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे ५६ षटकांचा खेळ होऊ शकला, मात्र त्यातही भारताने बिनबाद २३९ अशी मजल मारली आहे. शिखर धवनने दीडशतकी खेळी साकारली तर मुरली विजय शतकाच्या उंबरठय़ावर आहे.
लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे पुनरागमनाची संधी मिळालेल्या शिखर धवनने शतकी खेळी साकारत संधीचे सोने केले. धवन-विजय जोडीने सावध सुरुवात केली. खेळपट्टीचा नूर समजल्यानंतर धवनने पोतडीतील सर्व फटके बाहेर काढले. पावसामुळे उपाहारापूर्वीच खेळ थांबवण्यात आला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर धवनने आक्रमक पवित्रा कायम राखला. जुबैर हौसेनच्या गोलंदाजीवर चौकार खेचत धवनने कारकीर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. २४व्या षटकात शुवगता होमने धवनचा सोपा झेल सोडला. धवन-विजय जोडीने दुसऱ्यांदा दोनशे धावांची सलामी दिली. पूर्वार्धात बचावात्मक खेळ करणाऱ्या विजयने शेवटच्या सत्रात फटक्यांची लयलूट केली. अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा धवन १५० तर विजय ८९ धावांवर खेळत आहेत.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. इशांत शर्मा, उमेश यादव आणि वरुण आरोन यांना प्राधान्य दिल्याने भुवनेश्वर कुमारला संधी मिळू शकली नाही.  चेतेश्वर पुजाराला अंतिम अकरात स्थान मिळू शकले नाही.
दरम्यान एकदिवसीय मालिकेत मोठी जबाबदारी असल्याने एकमेव कसोटीसाठी बांगलादेशने मुख्य गोलंदाज रुबेल हुसैनला विश्रांती देण्याचा अजब निर्णय घेतला.
धावफलक
भारत (पहिला डाव) : शिखर धवन नाबाद १५०, मुरली विजय ८९.  एकूण : ५६ षटकांत बिनबाद २३९ अवांतर : ०
गोलंदाजी : मोहम्मद शाहीद १२-२-५२-०, सौम्या सरकार २-०-७-०, शुवगता होम १३-०-४७-०, शकीब अल हसन ९-१-३४-०, ताजिऊल इस्लाम १२-०५५-०, जुबैर हौसेन ७-०-४१-०, इम्रूल केयस १-०-३-०