Shikhar Dhawan 91 Runs Fiery Inning: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ मध्ये, इंडिया चॅम्पियन्स संघाचा सामना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघाविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने २० षटकांत २०३ धावांचा डोंगर उभारला आहे. ज्यामध्ये संघाने फक्त ७.४ षटकांत १०० धावा चोपल्या आहेत. भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन आणि अष्टपैलू युसूफ पठाण यांनी वादळी खेळी केल्या. धवनने ९१ धावांची खेळी करत जुन्या गब्बरची झलक दाखवून दिली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL 2025) मध्ये इंडिया चॅम्पियन्सचा सामना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सशी होत आहे. हा सामना इंडिया चॅम्पियन्ससाठी करा किंवा मरो असा आहे. या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताने प्रथम फलंदाजी करताना शानदार फटकेबाजी केली.
शिखर धवनचा झंझावात
भारताचा माजी सलामीवीर राहिलेल्या शिखर धवनने या सामन्यात ६० चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावा केल्या. त्याने फक्त चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. धवनने युसूफ पठाणसह ४६ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली आणि भारताला २०३ धावांचा टप्पा गाठून दिला. या सामन्यात गब्बर त्याच्या जुन्या लयीत दिसला.
उथप्पा आणि धवन यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी झाली. ३७ धावा काढल्यानंतर उथप्पा बाद झाला. उथप्पा बाद झाल्यानंतर भारताचे तीन विकेट झटपट गमावले. रायुडू आपले खाते उघडू शकला नाही आणि रैना ११ धावा काढल्यानंतर बाद झाला तर कर्णधार युवराज सिंग ३ धावा काढल्यानंतर बाद झाला. पण शिखर धवनने एका टोकाकडून चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.
भारताने ७.४ षटकांत केल्या १०० धावा
भारताने १०३ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर शिखर धवनने युसूफ पठाणच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनीही आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडला. पठाण आणि धवन यांनी ७.४ षटकांत १०० धावा केल्या.
२१ चेंडूत युसूफ पठाणने झळकावलं अर्धशतक
६० चेंडूत ९१ धावा करत धवन बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. दुसऱ्या टोकाला पठाणने २३ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी केली. पठाणने २१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह अर्धशतक केलं. ब्रेट लीने ४ षटकांत सर्वाधिक ५७ धावा दिल्या. कुल्टर-नाईलने ४९ धावा दिल्या.