देशातील करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गुरुवारी देशात ३ लाख ८६ हजार नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत आणि दररोज तीन हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडत आहेत. या कठीण काळात मदत करण्यासाठी अनेक नामवंत व्यक्ती आणि संस्था पुढे आल्या आहेत. करोनाविरुद्धच्या या युद्धात मदत करण्यासाठी भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवननेही आपला हात पुढे केला आहे.

देशातील सध्या सुरू असलेल्या करोनाविरुद्धच्या लढाईत ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी धवन २० लाख रुपये देणगी देणार आहे. धवनने एका ट्विटच्या माध्यामातून ही माहिती दिली. याव्यतिरिक्त तो आयपीएलमधील २०२१मधील सामन्यानंतर त्याला मिळणारी वैयक्तिक रक्कमही देणगी स्वरुपात देईल. हा निधी मिशन ऑक्सिजनसाठी वापरला जाईल.

धवन म्हणाला, ”आपण यावेळी अभूतपूर्व परिस्थितीत आहोत आणि एकमेकांना मदत करण्यासाठी जे काही करता येईल ते करणे ही काळाची गरज आहे. बर्‍याच वर्षांमध्ये मला तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थन प्राप्त झाले आहे, ज्याबद्दल मी आभारी आहे. आता देशातील लोकांना काहीतरी देण्याची माझी वेळ आली आहे.” शिखर धवन सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. या लीगमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत आहे.

 

पॅट कमिन्स आणि ब्रेट लीची भारताला मदत

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने भारतातील करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ३७ लाखांची मदत केली. कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने मदतीचा हात पुढे केला. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. कमिन्सने या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती त्याच्या सहकाऱ्यांना केली होती. या आवाहनानंतर लीने भारताला मदत केली आहे.