Shreyas Iyer Health Update: भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मैदानावर गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर आता श्रेयस अजूनही आयसीयूमध्येच असल्याची माहिती समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अय्यरला दुखापत झालेल्या ठिकाणी अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे. अहवालानुसार त्याला पाच ते सात दिवस रुग्णालयात राहावं लागू शकते. श्रेयसला झेल टिपताना मैदानावर दुखापत झाली होती आणि ही दुखापत गंभीर आहे. श्रेयस अय्यरला खबरदारी म्हणून अजूनही आयसीयुमध्ये ठेवलं आहे.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाहीत. वृत्तानुसार, श्रेयस गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे संसर्ग होण्याची भीती असल्याने अय्यरला आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या ४८ तासात त्याचा रक्तस्त्राव नाही थांबला तर अजून काही दिवस त्याला आयसीयुमध्येच ठेवण्यात येईल. त्याच्या रुग्णालयात राहण्याचा कालावधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यावर अवलंबून असेल. श्रेयस सुमारे एक आठवडा रुग्णालयात राहील अशी अपेक्षा आहे.
श्रेयस अय्यरला मैदानावर नेमकी कशी दुखापत झाली?
सिडनीमधील मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या बरगडीला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ३४ व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी झेल घेण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. बॅकवर्ड पॉइंटवर उभा असलेला श्रेयस अय्यर चेंडू हवेत जाताच त्याने पाहिलं आणि तो मागच्या दिशेने धावत गेला आणि त्याने यशस्वीपणे झेल घेतला.
पण झेल टिपल्यानंतर ज्या वेगाने तो धावत आला, त्यामुळे तो थेट मैदानावर कोसळला. मैदानावर पडत असताना चेंडू त्याच्या हातातून निसटणार होता जो त्याने शरीराकडे घट्ट पकडला, यादरम्यान तो त्याच्या डाव्या कुशीवर मैदानात आदळला. जमिनीवर पडताच श्रेयस वेदनेने कळवळताना दिसला. त्याने उठायचा प्रयत्न केला, पण त्याला ताठ उभं राहता येईन. फिजिओने तपासल्यानंतर श्रेयस मैदानाबाहेर गेला आणि त्याची दुखापत पाहता त्याला थेट रूग्णालयात नेण्यात आलं.
BCCIने श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत दिली मोठी अपडेट
BCCIने श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट देताना म्हटलं, “श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत २५ ऑक्टोबर २०२५ ला झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान डाव्या बरगडीच्या खालच्या भागावर धक्का बसून दुखापत झाली. तपासणीसाठी त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.”
“स्कॅनमध्ये त्याच्या धमनीला (spleen) किरकोळ जखम झाल्याचं आढळलं आहे. सध्या तो वैद्यकीय देखरेखीखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो हळूहळू सुधारणा होत आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून, सिडनी व भारतातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने, त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. भारतीय संघाचे डॉक्टर सध्या सिडनीमध्येच राहून श्रेयसच्या रोजच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे.”
