जागतिक बॅडमिंटन महासंघाने प्रकाशित केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने पाचव्या स्थानावर आगेकूच केली आहे, तर सायना नेहवालने आपले दुसरे स्थान टिकवले आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानापर्यंत मुसंडी मारणाऱ्या श्रीकांतची काही स्पर्धामध्ये लवकर गाशा गुंडाळल्यानंतर घसरण झाली होती. मात्र ताज्या क्रमवारीत त्याने आगेकूच जारी राखली अहे. परुपल्ली कश्यपची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो १२व्या स्थानावर आहे. एच. एस. प्रणॉयने त्याचे १७वे स्थान कायम राखले आहे. डच खुल्या स्पध्रेत छाप पाडणाऱ्या अजय जयरामने एका स्थानाने आगेकूच करीत २४वे स्थान मिळवले आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू १३व्या स्थानावर आहे. महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी दोन स्थानांनी प्रगती करून ११वे स्थान मिळवले आहे, तर पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी १८व्या स्थानावर आहेत.