न्यूझीलंडच्या ४१२ धावसंख्येपुढे श्रीलंकेची ६ बाद २२५ अशी केविलवाणी अवस्था आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ अंधूक प्रकाशामुळे लवकर थांबविण्यात आला. ३ बाद ४३वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेला आधार दिला तो थारंगा पर्णवितना आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्या भागीदारीने. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. मात्र टीम साऊदीने पर्णवितना आणि मॅथ्यूज या दोघांनाही बाद केले. यानंतर अनुभवी खेळाडू थिलान समरवीराने खेळपट्टीवर नांगर टाकला आणि संयमी खेळी साकारली. प्रसन्न जयवर्धने १२ धावा काढून जीतन पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. सूरज रणदीवने समरावीराला चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ९७ धावांची नाबाद भागीदारी केली. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला, तेव्हा समरावीरा ७६ आणि रणदीव ३४ धावांवर खेळत होते. श्रीलंकेचा संघ अजूनही १८७ धावांनी पिछाडीवर आहे.