Shubman Gill Akashdeep Chat Record in Stump Mic Video: ओव्हल कसोटी सामना आता रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. टीम इंडियाला विजयासाठी चार विकेट्स हव्या आहेत, तर इंग्लंडला जिंकण्यासाठी ३५ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी शतकं झळकावत ३७४ धावांचा पाठलाग अगदी सोपा केला. पण या दोघांनीही आपल्या विकेट्स गमावल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. पण यादरम्यानचा गिल आणि आकाशदीप यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

भारत-इंग्लंड ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशीचा शुबमन गिल आणि आकाशदीप यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत असून त्यांच्यातील बोलणं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालंय, यामध्ये गिल आकाशदीपला विचारत आहे की तू इंजेक्शन घेतलं आहेस का? आता यामागचं कारणही समोर आलं आहे.

शुबमन गिलने आकाशदीपला इंजेक्शनबाबत का विचारलं?

भारताचे गोलंदाज हॅरी ब्रूक आणि जो रूटच्या समोर निष्प्रभ दिसत होते. पण अखेरीस आकाशदीपच्या गोलंदाजीवर ब्रूक मोठा फटका खेळताना त्याची बॅट उडाल्याने तो बाद झाला. पण त्यापूर्वी हॅरी ब्रूकविरूद्ध गोलंदाजी करताना त्याने मारलेला फटका येऊन आकाशदीपच्या पायावर येऊन आदळला. यानंतर आकाशदीपला चालताना थोडा त्रास होत होता. त्याला नीट चालताही येत नव्हतं.

चेंडू लागल्यानंतर काही वेळाने आकाशदीप पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानावर आला. पुढील षटक आकाशदीपला देण्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलने त्याला विचारलं की “तू इंजेक्शन घेऊन आला आहेस का?” गिल त्याला वेदना कमी करण्याच्या इंजेक्शनबद्दल विचारत होता आणि हा व्हिडिओ समोर आला आहे.

आकाशदीपने ओव्हल कसोटीत आतापर्यंत ३७ शटकं टाकली आहेत. आकाशदीपने पहिल्या डावात १७ षटकांचा स्पेल टाकला पण त्याला एकच विकेट घेता आली आणि ८५ धावा दिल्या. दुसऱ्या डावात आकाशदीप त्याच्या लयीत दिसला नाही. आकाश दीपला या डावात आतापर्यंत फक्त एकच विकेट घेण्यात यश आलं आहे, ज्यामध्ये त्याने हॅरी ब्रूकला झेलबाद केलं.

याशिवाय, प्रसिद्ध कृष्णाने आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीत १०० हून अधिक धावा दिल्या आहेत आणि तीन विकेट्स घेतल्या आहेत, तर मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या आहेत. पाचव्या दिवशी कोणता संघ बाजी मारणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.