Shubman Gill Fitness Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना २०० धावांचा आकडाही गाठता आलेला नाही आणि गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. पण यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलला दुखापत झाली आहे आणि या दुखापतीमुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शुबमन गिलला हॉस्पिटमध्ये दाखल केल्याने तो उर्वरित कसोटी मालिका खेळणार का याबाबत शंका आहे. भारताच्या डावात सायमन हार्मरच्या गोलंदाजीवर चौकार मारताच त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. चौकार मारल्यानंतर त्याच्या मानेत अचानक चमक भरली आणि त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर लगेच रूग्णालयात नेण्यात आलं. स्कॅन आणि तपासणीनंतर, खबरदारी म्हणून त्याने रात्रभर रुग्णालयातच थांबावे, असा निर्णय घेण्यात आला.
शुबमन गिलला मैदानावर नेमकी कशी दुखापत झाली?
दुखापतीमुळे मैदानाबाहेर जाण्यापूर्वी गिलने फक्त तीन चेंडू खेळले होते. त्याने हार्मरच्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला फटका खेळत चौकार लगावला. पण यादरम्यान त्याच्या मानेत चमक भरली आणि तो मान पकडूनच उभा राहिला. फिजिओ ताबडतोब मैदानावर आले, गिलला मानेची हालचालही करता येईना. तो स्तब्ध उभा होता. अखेरीस गिल रिटायर हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ही घटना ड्रिंक्स ब्रेकनंतर ३५ व्या षटकात घडली.
भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने सांगितल्यानुसार, शुबमन गिल सकाळी उठल्यावर त्याच्या मानेत चमक भरल्याचे (neck spasm) त्याला जाणवत होते. शनिवारी तो रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर, सामना सुरू होण्यापूर्वी वॉर्म-अपदरम्यान तो मानचे व्यायाम करतानाची दृश्यही दिसली होती. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल म्हणाला, “त्याच्या मानेत अचानक चमक कशी भरली हे आम्ही तपासत आहोत. काल रात्री तो कदाचित नीट झोपला नसेल. याचा वर्कलोडशी काहीही संबंध नाही.”
शुबमन गिलच्या दुखापतीबाबत BCCIने दिली अपडेट
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार शुबमन गिलच्या मानेला दुखापत झाली. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. सध्या तो रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. उर्वरित कसोटीत तो बाहेर झाला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
गिलला मानेला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान, त्याने मानेमध्ये चमक भरल्याची तक्रार केली होती आणि बेंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटीला तो मुकला होता.
