Shubman Gill Mohammed Siraj On-Field Argument : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला असून उभय देशांमध्ये खेळवण्यात आलेली पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा सहा धावांनी पराभव केला. या सामन्यात शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची तर भारताला चार विकेट्सची आवश्यकता होती. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारताने इंग्लंडचे तीन गडी झटपट बाद केले. मात्र, त्यानंतर दुखापतग्रस्त ख्रिस व्होक्स मैदानात उतरला. व्होक्स एका हाताने फलंदाजी करत होता तर गट अॅटकिन्सन त्याला स्ट्राइकपासून दूर ठेवत होता.
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल व जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज या दोघांनी मिळून गट अॅटकिन्सनला बाद करण्याची योजना आखली होती. मात्र, त्यात त्यांना यश मिळत नव्हतं. तेव्हा सिराजने भर मैदानातच गिलवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावैळी मैदानात काय घडलं आणि भारतीय संघाची नेमकी योजना काय होती याबाबत सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने माहिती दिली आहे.
गिल-सिराजची योजना काय होती?
अॅटकिन्सन व व्होक्स मैदानावर उभे होते. अॅटकिन्सन प्रत्येक षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राइक स्वतःकडे ठेवत होता. जेणेकरून दुखापतग्रस्त व्होक्सला फलंदाजी करावी लागू नये. दरम्यान, ८४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गिल व सिराजने ठरवलं की वाइड यॉर्कर चेंडू टाकायचा. त्यामुळे अॅटकिन्सन षटकार लगावू शकणार नाही, तसेच एकेरी धाव घेणं देखील त्याला अवघड जाईल. तसेच त्याने एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाच तर दोघांपैकी कोणत्याही फलंदाजाला धावबाद करता येईल.
मैदानात नेमकं काय घडलं?
गिल म्हणाला, “शेवटचा चेंडू फेकण्याआधी आम्ही यष्टीरक्षक ध्रुव जुरेलला सांगणार होतो की तू एका हातातील ग्लोव्ह काढून ठेव जेणेकरून व्होक्सला धावबाद करण्याची संधी मिळाली तर तू तुझी कामगिरी सहज फत्ते करू शकशील. परंतु, मी ध्रुवपर्यंत हा संदेश वेळेत पोहोचवू शकलो नाही. सिराजने मला सांगितलं होतं की तू ध्रुवला ग्लोव्ह काढून ठेवायला सांग. परंतु, मी ध्रुवला सांगेपर्यंत अॅटकिन्सनने चेंडू टोलवला होता, अॅटकिन्सन व व्होक्स धावू लागले होते. त्यामुळे ध्रुवला ग्लोव्ह काढून व्होक्सला धावबाद करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर सिराज मला म्हणाला, ‘तू ध्रुवला सांगितलं का नाहीस?’ त्यानंतर सिराजने तो विषय सोडून दिला आणि तो क्षेत्ररक्षण करायला सीमारेषेजवळ गेला.”