Shubman Gill Suicidial Run Out Video Viral: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशीच पावसाने हजेरी लावली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण पावसाची मात्र जोरदार बॅटिंग सुरू आहे. लंचब्रेकनंतर तासभराने सामना सुरू झाला आणि यानंतर शुबमन गिलच्या विचित्र विकेटमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा कर्णधार शुबमन गिलने तर स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आपली विकेट गमावली. भारताने सुूरूवातीलाच दोन विकेट गमावल्यानंतर गिलने साई सुदर्शनच्या मदतीने भारताचा डाव सावरत होता. दरम्यान गिलने ११ धावा करताच सुनील गावस्करांचा मोठा विक्रम मोडत नव्या विक्रमाला गवसणी घातला.

शुबमन गिलचं Sucidial Run out

लंचब्रेकनंतर पावसामुळे तासभर उशिरा सामना सुरू झाला. यानंतर गिलने मोठी चूक करत इंग्लंडला विकेट भेट दिली. एटकिन्सनने स्वत:च्या गोलंदाजीवरच गिलला कमालीचं धावबाद केलं. गिलने हलक्या हाताने शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला आणि थेट धावत सुटला. अर्ध्यापेक्षा जास्त क्रीज धावल्यानंतर त्याने एटकिन्सनला चेंडू टिपताना पाहिलं आणि जाणवलं की ही धाव पूर्ण होणार नाही. तेव्हा तो थांबला आणि मागे धावत सुटला.

गिल क्रीजवर पोहोचायच्या आधीच एटकिन्सने चेंडू टिपला आणि वायूवेगाने स्ट्राईकर एन्डच्या दिशेने मारला. एटकिन्सनचा रॉकेट थ्रो इतका अचूक होता की थेट बेल्स विखुरल्या. धाव होणार नाही अशा ठिकाणी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न गिलच्या अंगलट आला. धाव चोरण्याचा निर्णयही गिलचा होता, साई सुदर्शन त्याला माघारी जाण्यासाठी सांगत होता पण तोपर्यंत गिल बराच भाग धावत पोहोचला होता आणि बाद झाला.

आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३७ सामने खेळणारा शुबमन गिल दुसऱ्यांदा धावबाद झाला आहे. गिल याआधी गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत धावबाद झाला होता. शुबमन गिल या धावबादसह ३५ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा करत बाद झाला.