भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी अटीतटीची झाली, पण या सामन्यात मैदानावर खेळाडूंमधील वादावादीने अधिक लक्ष वेधून घेतलं. विशेषतः तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, भारतीय फलंदाज शुबमन गिल आणि इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला. या घटनेची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू असून खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभारलं. पण हा वाद नेमका का झाला आणि मैदानात नेमकं काय घडलं, यावर शुबमन गिलने वक्तव्य केलं आहे.

मँचेस्टर कसोटीपूर्वी शुबमन गिलने जॅक क्रॉलीबरोबर का वाद रंगला, यावर वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटी शुबमन गिल आणि जॅक क्रॉली यांच्यात वाद झाला. जॅक क्रॉली कमीत कमी षटकं व्हावी यासाठी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न करत होता, हे पाहून गिल संतापला. पण चौथ्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत गिलने खुलासा केला की इंग्लंडने केवळ फलंदाजी करतानाच नव्हे तर डावाची सुरुवात करतानाही वेळ वाया घालवला होता.

गिलच्या मते, इंग्लंड संघाला खेळण्यासाठी ७ मिनिटं देण्यात आली होती, परंतु ते ९० सेकंद उशिरा मैदानावर पोहोचले. यानंतरही, त्यांनी मैदानावरही वेळ वाया घालवला. गिल या घटनेबाबत म्हणाला, “हो बरीच जण या घटनेविषयी बोलत आहेत, त्यामुळे नेमकं काय घडलं हे मी एकदाच स्पष्ट करतो. त्यादिवशी इंग्लंडच्या फलंदाजांना खेळण्यासाठी ७ मिनिटं शिल्लक होती. दोन्ही खेळाडू मैदानावर ९० सेकंद उशिरा आले. फक्त १० आणि २० सेकंद नाही तर ९० सेकंद उशिरा पोहोचले.”

‘बरेचसे संघ षटक कमी व्हावी यासाठी अशा रणनिती आखतात, आम्हीही असं केलं असत, पण त्यामागे देखील एक पद्धत असते. जर एखाद्या खेळाडूला चेंडू लागला तर मैदानावर फिजिओ येतोय, त्यामुळे वेळ जातोय तर ठिक आहे. पण मैदानावर मुद्दाम ९० सेकंद उशिरा येणं हे नक्कीच खेळ भावनेला साजेसं नाहीये,” असं गिलने पुढे स्पष्ट केलं.

शुबमन गिल त्या घटनेबाबत पुढे म्हणाला, “त्या घटनेपूर्वी, अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या, पण त्या घडल्या आणि मला त्या गोष्टींचा अभिमानही नाहीये, पण हळूहळू मैदानावर घडणाऱ्या गोष्टींची तीव्रता वाढत गेली. आम्ही जी प्रतिक्रिया दिली ती काही अचानक आली नाही. आमचा असं वागण्याचा कोणताही हेतू नव्हता. जेव्हा तुम्ही सामना खेळत असता तेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी खेळता. त्यात खूप भावना गुंतलेल्या असतात आणि जेव्हा तुम्ही पाहता की ज्या गोष्टी घडायला नको त्या मुद्दाम घडत आहेत, तेव्हा कधीकधी अचानक भावनांवरील ताबा सुटतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. भारताला मालिका विजयासाठी आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर चौथा कसोटी सामना जिंकणं अनिवार्य असणार आहे, कारण इंग्लंडचा संघ लॉर्ड्सच्या मैदानावरील विजयासह २-१ ने आघाडीवर आहे.