आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत लागोपाठ दुसरे विजेतेपद

पुण्याच्या १६ वर्षीय पूर्वा बर्वेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत लागोपाठ दुसरे अजिंक्यपद पटकाविले. तिने मिलान (इटली) येथे झालेल्या इटालियन कनिष्ठ स्पर्धेत हे यश मिळविले. पूर्वाने अंतिम फेरीत स्पेनच्या एलिना अँड्रय़ूवर २१-९, २१-९ असा सरळ दोन गेम्समध्ये विजय मिळविला. पूर्वाने दोन्ही गेम्समध्ये स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. पूर्वाने या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील ३३ वी मानांकित खेळाडू मारिया डेल्चेवावर आश्चर्यजनक विजय नोंदविला होता.

पूर्वाने विजेतेपदाबद्दल सांगितले, ‘‘इस्रायलमध्ये झालेल्या स्पर्धेतील विजेतेपदानंतर मी येथेही तीच मालिका सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता व त्यानुसारच खेळ केला. मारियासारख्या अनुभवी खेळाडूवर मात केल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला व विजेतेपद आपलेच आहे, हे ध्येय ठेवीत मी अंतिम फेरीत सहज विजय मिळविला. मारियाविरुद्ध प्रथमच खेळले होते. तरीही कोणतेही दडपण न ठेवता नैसर्गिक खेळ केला व त्याचाच फायदा झाला.’’

पूर्वाने या स्पर्धेत मार्टिना कोर्सिनी (इटली), लॉरा सांतोस (स्पेन), क्लारा कोट्टी (फ्रान्स) यांच्यावर मात केली होती. पूर्वाचे प्रशिक्षक निखिल कानेटकर यांनी सांगितले, ‘‘लागोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविणे ही  सोपी गोष्ट नाही, मात्र पूर्वा हिने जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाला मेहनतीची जोड दिली.’’