भारतीय महिला विश्वचषकातील सदस्य शिखा पांडेने एका कार्यक्रमामध्ये क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या राज्यात स्त्री-पुरुष समानता आहे, त्या राज्यातून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, असे तिने इंडिया टुडेच्या ‘द लल्लनटॉप’ या कार्यक्रमात सांगितले. लखनऊमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिखाने आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. वयाच्या पाचव्या वर्षीपासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्याचे सांगत गोव्यातील खेळ वारसा हा अभूतपूर्व असल्याचे ती म्हणाली.

या ठिकाणी फुटबॉलचा खेळ लोकप्रिय असला तरी इतर खेळ देखील महत्त्वपूर्ण समजले जातात. एवढेच नाही तर खेळासाठी प्रेरणा देखील दिली जाते, असे तिने सांगितले.  क्रिकेटच्या आवडीबद्दल ती म्हणाली की, सुरुवातीपासूनच क्रिकेटचे वेड होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणारी अॅशेस मालिका पाहण्यासाठी सकाळीच टेलिव्हिजनसमोर बसायचे. याकाळात कधी श्रीनाथच्या गोलंदाजीनं तर कधी फ्लिंटॉफच्या अष्टपैलू कामगिरीनं आनंद मिळवायचे. १९९६ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या यांचा शाहरजा मालिकेतील खेळ पाहिल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा निश्चय केला, असे तिने सांगितले.

ज्यावेळी तिला अष्टपैलू होण्यामागील रहस्य काय? असे विचारण्यात आले. त्यावेळी तिने दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॅकचे नाव सांगितले. पोलॅकचा खेळ पाहूनच अष्टपैलू होण्याचे ठरवले, असे ती म्हणाली. आयसीसी विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ३ तर इंग्लंडविरुद्ध २ बळी मिळवत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. २०१४ मध्ये क्रिकेटच्या मैदानात उतरल्यापासून आतापर्यंत शिखा भारतीय संघात स्थान टिकवून आहे.