आशियाई अॅथलेटिक्स स्पध्रेचा तिसरा दिवस भारतासाठी रुपेरी झळाळीचा ठरला. भारताने शुक्रवारी आपल्या खात्यावर दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची भर घातली. परंतु गुणतालिकेत सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. भारताच्या के. प्रेमकुमार याने लांब उडीत रौप्यपदकाची कमाई केली तर आशियाई क्रीडा स्पर्धा विजेती सुधा सिंग हिने ३,००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. समरजित सिंग याने भालाफेकीत कांस्यपदक मिळवित आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत स्वत:च्या पहिल्याच पदकाची नोंद केली. याचप्रमाणे १०० मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या जे. हेमाश्री हिने कांस्यपदक पटकावले.
पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या लांब उडीत भारताच्या के.प्रेमकुमार याने रुपेरी कामगिरी करताना ७.९२ मीटर अशी कामगिरी केली. त्याचे या स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाकरिता तो परदेशात प्रशिक्षण घेणार आहे, त्याचा फायदा त्याला ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रेमकुमारने सांगितले. तामिळनाडूच्या २० वर्षीय प्रेमकुमारने ऑलिम्पिक ‘अ’ श्रेणी पात्रता निकष पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. या क्रीडाप्रकारात चीनच्या वाँग जियानान (७.९५ मीटर) याने सुवर्ण तर चीनच्याच तांग गोंगोचेन (७.८९ मीटर) याने कांस्यपदक मिळविले.
भालाफेकीत समरजित सिंग याने दुसऱ्या प्रयत्नात ७५.०३ मीटपर्यंत भालाफेक केली. त्याने अन्य चार प्रयत्नांत चुका केल्या होत्या. राजस्थानच्या समरजितचे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. तसेच त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी त्याची ७४.८० मीटर ही सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. तो काशिनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याने वडिलांच्या सल्ल्यानुसार भालाफेक हा खेळ निवडला. ‘‘हा निर्णय सार्थकी लागला. या खेळात कारकीर्द सुरू केल्यानंतर आशियाई स्पर्धेत पदक मिळविण्याचे माझे ध्येय होते, हे ध्येय साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,’’ असे तो म्हणाला.
सुधा सिंगने स्टीपलचेस ही शर्यत ९ मिनिटे ५६.२७ सेकंदात पार केली. ती मूळची बरेली (उत्तरप्रदेश) येथील खेळाडू असून सध्या मुंबई येथे रेल्वेत नोकरी करीत आहे. बहारिनच्या रुथ जेबेट हिने सुवर्णपदक जिंकताना ९ मिनिटे ४०.८४ सेकंद वेळ नोंदवित स्पध्रेतील विक्रम केला. तिने जपानच्या मिनोरी हयाकारी हिचा दोन वर्षांपूर्वीचा ९ मिनिटे ५२.४२ सेकंद हा विक्रम मोडला.
महिलांची १५०० मीटर धावण्याची शर्यत संयुक्त अरब अमिरातीच्या बेल्थेम बेलाइंचने ४ मिनिटे १३.६७ सेकंदांत जिंकली. मिमी गॅब्रेजेओर्जेस (बहारिन) व अयाको जिनोउची (जपान) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. पुरुष गटात ही शर्यत जिंकण्याचा मान सौदी अरेबियाच्या एमाद हमीद नूरने मिळविला. त्याने ३ मिनिटे ३९.५१ सेकंदांत अंतर पार केले. महंमद अलगरानी (कतार) व बिलाल मन्सूर अली (बहारिन) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले.
महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यत जपानच्या अयाको किमुरा हिने १३.२५ सेकंदात जिंकली. कझाकिस्तानच्या अनास्तासिया सोप्रुनोव्ह हिने १३.४४ सेकंद वेळ नोंदवत रुपेरी वेध घेतला. भारताच्या हेमाश्री हिने १४.०१ सेकंदांत हे अंतर पार करीत कांस्यपदक मिळविले.
रिले शर्यतीत भारतीय संघ अपात्र
पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत भारतीय संघ अपात्र ठरला. या शर्यतीत भारताची सुरुवात चांगली झाली होती. मात्र समीर कुमार व मणिकांत यांच्यात बॅटन देताना मणिकांत हा २० मीटर अंतर बॅटन न घेताच धावल्यामुळे भारतीय संघाला बाद ठरवण्यात आले.
‘‘ही स्पर्धा भारतीय मैदानावर होत असल्यामुळे त्यामध्ये पदक मिळविणे, हे माझे स्वप्न होते आणि ते आता साकार झाल्यामुळे मी भारावून गेलो आहे. मात्र सुवर्णपदक थोडक्यात हुकल्याचे दु:खही मला वाटत आहे. प्रतिकुल वाऱ्याचा त्रास झाला. तसेच उडी घेतानाही प्रतिकुल वाऱ्यामुळे अपेक्षेइतकी झेप घेता आली नाही. आणखी प्रयत्न केला असता तर सुवर्णपदकही मिळविले असते!’’
के. प्रेमकुमार
स्टीपलचेस हा माझा हुकमी क्रीडाप्रकार आहे. त्यामध्ये रौप्यपदक मिळविल्यामुळे मला समाधान झाले असले तरी सुवर्णपदक थोडक्यात गेल्यामुळे मी थोडीशी निराश झाले. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये हे अपयश धुवून काढण्याचा मी प्रयत्न करीन. त्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर मी लक्ष केंद्रीत करणार आहे!
सुधा सिंग
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2013 रोजी प्रकाशित
रुपेरी झळाळी! * लांब उडीत प्रेमकुमारला, स्टीपलचेसमध्ये सुधाला रौप्य
आशियाई अॅथलेटिक्स स्पध्रेचा तिसरा दिवस भारतासाठी रुपेरी झळाळीचा ठरला. भारताने शुक्रवारी आपल्या खात्यावर दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची भर घातली. परंतु गुणतालिकेत सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. भारताच्या के. प्रेमकुमार याने लांब उडीत रौप्यपदकाची कमाई केली तर आशियाई क्रीडा स्पर्धा विजेती सुधा सिंग हिने ३,००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 06-07-2013 at 05:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silver glossiness