जपानचा माजी विश्वविजेता हारूनो ओकूनोकडून पराभव पत्करल्यामुळे पूजा गेहलोतला ५३ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २३ वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील हे भारताचे दुसरे रौप्यपदक ठरले. अंतिम सामन्यात आकुनोने पूजाचा २-० अशा फरकाने पराभव केला. भारताच्या खात्यावरील पहिले रौप्यपदक आठवडय़ाच्या पूर्वार्धात रविंदरने (६१ किलो) कमावले आहे. तीन वेळा जागतिक कनिष्ठ पदकविजेत्या साजन भानवालने (७७ किलो) उपांत्य लढतीत जपानच्या कोडाय साकुराबाकडून ४-५ असा पराभव पत्करला. त्यामुळे त्याला कांस्यपदकाची लढत द्यावी लागणार आहे.