अव्वल मानांकित पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांनी शानदार विजयासह एक लाख २० हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेची तिसरी फेरी गाठली आहे. गेल्याच आठवडय़ात मकाऊ खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूने महिला एकेरीत इंडोनेशियाच्या वुहान काहया उतामी सुकुपुत्रीचा २१-१२, २१-९ असा सहज पराभव केला.
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत दोनदा कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूची पुढील फेरीत सातव्या मानांकित यांग मि ली आणि ही बिंगजियाओ (चीन) यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल.
बीडब्ल्यूएफ सुपर सीरिज फायनल्ससाठी पात्र ठरणाऱ्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील श्रीकांत पुरुष एकेरीत झुंजार लढत देत इंडोनेशियाच्या सपुत्र विकी अंगाचा २१-१४, १७-२१, २५-२३ असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत त्याची चीनच्या क्विआओ बिनशी लढत होईल. आठव्या मानांकित आरएमव्ही गुरूसाइदत्तने तिसरी फेरी गाठताना सिंगापूरच्या किआन येव लोहचा २१-१९, १९-२१, २१-१५ असा पराभव केला. पुढील फेरीत मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैन झैनुद्दीनशी त्याचा सामना होणार आहे.
तिसऱ्या मानांकित एच. एस. प्रणॉयचे आव्हान मात्र संपुष्टात आले. चीनच्या शि युकीने त्याचा २१-१२, २०-२२, २१-१३ असा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhu srikanth gurusaidutt reach round 3 of indonesia masters
First published on: 04-12-2015 at 01:19 IST