इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया आणि निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या सुरेश रैनाने ४५ चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी साकारली. रैना, धोनी आणि युवराजच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाला बंगळुरूमध्ये २०३ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवता आले. रैनाने आपल्या ६३ धावांच्या खेळीमध्ये तब्बल पाच खणखणीत षटकार ठोकले. पण यातील एका षटकारामुळे प्रेक्षकांमध्ये उपस्थित लहान मुलाला दुखापत झाली. सुरेश रैनाने हवेतून सीमेपार हाणलेल्या चेंडूमुळे सहा वर्षांच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने किरकोळ दुखापत असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. इतकंच नाही, तर तो चिमुकला सामना पाहण्यासाठी पुन्हा स्टेडियममध्ये आला आणि विजयी सेलिब्रेशनच करून घरी गेला.
सहा वर्षांच्या सतिशला त्याचे आई-वडील त्याला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा इंग्लंडविरुद्धचा ट्वेन्टी-२० सामना पाहण्यासाठी घेऊन गेले होते. मैदानात रैना आणि धोनीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या दोघांची फलंदाजी पाहून सतीष खुश झाला. तेव्हाच रैनाने जोरदार भिरकावलेला चेंडू त्याच्या दिशेने आला आणि त्याच्या मांडीवरच आदळला. चेंडू लागल्याने तो कळवळला. सतीशच्या हाडाला काही गंभीर दुखापत झाली नाही ना हे पाहण्यासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी किरकोळ दुखापत असल्याचे सांगितल्यानंतर प्राथमिक उपचार करून सोडले. क्रिकेटवेड्या सतीशचा जीव मात्र त्या सामन्यातच होता. सतीशने आई-वडीलांकडे पुन्हा स्टेडियममध्ये जाण्याचा हट्ट केला. आई-वडिलांनी सतीशचा हट्ट पुरवत त्याला पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घेऊन गेले.