रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर अखेर भारतीय हॉकीच्या प्रशिक्षकपदाची शोधमोहीम अखेर संपलेली आहे. भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. याचसोबत भारताच्या ज्युनिअर विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांना महिला संघाच्या High Performance Director या पदावर बढती देण्यात आलेली आहे. महिला संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही हरेंद्रसिंहच पार पाडणार आहेत.
सध्या भारतीय महिलांचा संघ युरोप दौऱ्यावर आहे. त्यामुळे हा दौरा संपल्यानंतर मरीन भारतीय संघाचा पदभार स्विकारतील. नवीन प्रशिक्षकांच्या निवडीबद्दलचा निर्णय भारताचे नवीन क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध केला.
Pleased to announce appt of Sh Harendra Singh, Dronacharya Award winner,as High Performance Specialist Coach fr Indian Snr Women Hockey Team
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) September 8, 2017
Current Chief Coach of Indian Senior Women Hockey Team, Mr. Waltherus Marijne,will take over as Chief Coach of Indian Senior Men Hockey Team
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) September 8, 2017
हॉकी इंडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार हरेंद्रसिंह आणि मरीनआगामी टोकीयो ऑलिम्पिकपर्यंत भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. ओल्टमन्स यांची हकालपट्टी केल्यानंतर हॉकी इंडियाने नवीन प्रशिक्षकांसाठी जाहीरात करण्याचं ठरवलं होतं. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी १५ सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र काही दिवसांमध्येच हॉकी इंडियाने आपल्या संकेतस्थळावरुन ही जाहीरात हटवली. ‘हॉकी इंडिया’ आणि ‘साई’च्या अधिकाऱ्यांनी नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्याऐवजी मरिजने यांना पदभार देण्यात स्वारस्य दाखवलं.
४३ वर्षी मरीन यांनी फेब्रुवारी महिन्यात भारतीय महिला संघाच्या हॉकी प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारली होती. आतापर्यंत त्यांनी भारताच्या पुरुष संघासोबत कधीही काम केलेलं नाहीये. त्यामुळे सुरुवातीला ही जबाबदारी स्विकारण्यात मरिजने तयार नव्हते. मात्र साई आणि हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर जोर्द मरीन यांनी ही जबाबदारी स्विकारण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघ आगामी स्पर्धांमध्ये कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.