दक्षिण कोरियाविरुद्ध भारतीय महिलांनी मिळवलेला २-१ असा मालिकाविजय हा संघाच्या आत्मविश्वासात भर घालणारा ठरला आहे. विशेषत्वे येत्या महिला हॉकी मालिकेच्या पाश्र्वभूमीवर हे यश उपयुक्त असल्याचे मत भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी व्यक्त केले.

ही मालिका जपानच्या हिरोशिमा शहरात १५ जूनपासून सुरू होणार आहे. भारताने कोरियाविरुद्धची मालिका जिंकताना प्रारंभीचे दोन सामने जिंकले तर अखेरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. ‘‘या विजयी मालिकेची सांगता पराभवाने होईल, असे वाटत नव्हते. मात्र, तो अनुभवदेखील मोलाचा आहे. प्रारंभीचे दोन सामने अगदी नियोजनाप्रमाणे खेळल्याचा फायदा झाला. परंतु, अखेरच्या सामन्यात काही त्रुटी राहिल्या. त्यावर मात करण्याचा प्रयत्न आता पुढील मालिकेत करणार आहोत. विजयी कामगिरी विसरून आता पुढील मालिकेत लक्ष्य केंद्रित करून खेळण्यावर भर देत कामगिरी उंचावण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरच ऑलिम्पिक पात्रतेच्या या स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी करू शकू,’’ असे मरिन यांनी सांगितले.

बेंगळूरुत २७ मेपासून होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरात २६ अव्वल महिला हॉकीपटूंना सहभागी करून घेतले जाणार आहे. पुढील स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा समावेश अ गटात करण्यात आला असून त्यात उरुग्वे, पोलंड आणि फिजी या अन्य तीन देशांचादेखील समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.