Smriti Mandhana Equals World Record: भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची चमक दाखवली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. भारताच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयात स्मृती मानधनाच्या शतकाने मोठी भूमिका बजावली. या शतकासह तिने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरला. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने भारताला पुन्हा एकदा चांगली सुरूवात करून दिली. दोघींनीही पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यादरम्यान स्मृती मानधनाने शतक झळकावत तिचा डाव पुढे नेला.
स्मृतीने ९१ चेंडूत १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची शानदार खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील स्मृतीचं हे १२वं शतक आहे. स्मृती मानधनाही दोन कॅलेंडर वर्षात ३ शतकं करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू आहे. मानधनाने २०२५ मध्ये आतापर्यंत तीन एकदिवसीय शतकं झळकावली आहेत. २०२४ मध्ये तिने चार एकदिवसीय शतकं झळकावली होती.
२०२५ मध्ये स्मृती मानधना महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. २०२५ मध्ये तिने आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये ८०३ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. २०२५ मध्ये ती महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारी खेळाडू आहे. तिच्यानंतर भारताची प्रतीका रावल आहे, जिने ६५८ धावा केल्या आहेत.
स्मृती मानधनाचा मोठा विक्रम
स्मृती मानधनाने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. स्मृती ही न्यूझीलंडच्या सूझी बेट्सबरोबर एकदिवसीय महिला क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकं करणारी खेळाडू आहे. सूझी बेट्सने २००६ मध्ये पदार्पण केल्यानंतर आजपर्यंत १३० डावांमध्ये १२ शतकं आणि ३३ अर्धशतक केली आहेत. तर स्मृतीनेही १०६ डावांमध्ये १२ शतकं आणि ३३ अर्धशतकं केली आहेत. सूझीच्या या मोठ्या विक्रमाची स्मृतीने आता बरोबरी साधली आहे.
Century and going strong ?
— BCCI Women (@BCCIWomen) September 17, 2025
Elegance and class from the #TeamIndia vice-captain! ✨
Updates ▶️ https://t.co/LvgKs0weye#INDvAUS | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti pic.twitter.com/Q2lfBXu7GL
स्मृती मानधनाने २०१३ मध्ये भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने १०७ सामन्यांमध्ये ४,७६३ धावा केल्या आहेत, ज्यात १२ शतकं आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. ती भारतीय फलंदाजी क्रमातील एक महत्त्वाची खेळाडू आहे.