रेकिफेमधील एरिना पेर्नाम्बुकोवरील हा शेवटचा सामना. एका भला मोठय़ा स्क्रीनवर पिटबुलचे विश्वचषकाचे अधिकृत गाणे सुरू होते, ‘वुई आर वन (ओले ओला)’. स्टेडियममधील स्टँडच्या मागे बरीच गर्दी जमली होती. बिअर घेण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. सुरक्षारक्षक चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होते. तेवढय़ात एक बाई ओरडली, ‘‘हा कोण टक्कल पडलेला माणूस गात आहे? अजून विश्वचषक संपायला बराच वेळ बाकी आहे.’’
पिटबुलच्या सूरात जेनिफर लोपेझ आणि क्लॉडिया लेईट्टे यांनीही सूर मिसळला होता. पिटबुलचे हे गाणे ब्राझीलवासियांमध्ये विश्वचषकाचा ज्वर रंगवण्यात अपयशी ठरले होते. ‘‘आतापर्यंतचे हे विश्वचषकातील सर्वात सुमार दर्जाचे अधिकृत गाणे आहे,’’ असे ब्राझीलमधील लिओनिन्हो ओरडला. ‘‘लंडनमध्ये मी काही काळ घालवल्यामुळे मला थोडेफार इंग्लिश समजत आहे. पण हा गायक काय बरळतोय, हेच मला कळत नाही. मग तुम्हीच सांगा, ब्राझीलच्या चाहत्यांना या गाण्याविषयी काय वाटत असेल? यापूर्वीची गाणी फारच छान होती,’’ त्याची ही प्रतिक्रिया ब्राझीलवासीयांच्या भावना काय असतील, हे सांगणारी होती.
ज्युनियर फ्रान्सिस्को या सांबा डान्सरचे निरीक्षण फारच छान होते. ‘‘त्यांनी या गाण्याच्या ओळी फारच वाईट लिहिल्या आहेत. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सांबा डान्सर्सचा समावेश करण्यात आला आहे. पण त्या फक्त आपले पोट हलवत आहेत. हा बेली डान्सचा प्रकार आहे, सांबा डान्स नाही. ते अमेरिकन आहेत, ब्राझिलियन्स नाहीत.’’
या गाण्यात वापरण्यात आलेले संगीत आणि शब्द, हे ब्राझीलच्या संस्कृतीचा भाग नाहीत, अशी टीका रस्त्यांवरून जाणाऱ्या स्थानिक लोकांमध्ये दिसून येते. या गाण्यात तीन गायक आहेत. त्यापैकी लेईट्टे ही ब्राझिलियन गायिका. पण गाण्यातील तिचा सहभाग फारच कमी आहे. ‘‘विश्वचषकाच्या या गाण्यात ब्राझीलची संस्कृती, परंपरेची झलक कुठेच दिसत नाही. त्यापेक्षा २०१०च्या विश्वचषकाचे गाणे फारच छान होते. निदान आफ्रिकेचा उल्लेख तरी येत होता. आता फक्त अमेरिकेतील मायामी समुद्रकिनाऱ्याची झलक या गाण्यातून दिसून येते. ब्राझीलच्या रस्तोरस्ती तुम्हाला सांबा डान्सर दिसतील. हीच खरी ब्राझीलची संस्कृती आहे. आता त्याच ब्राझिलियन शैलीनुसार आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे,’’ फ्रान्सिस्को सांगत होता.
१९८०च्या दशकात ब्राझीलमधील लष्करशाही संपुष्टात आल्यानंतर ‘जिंगल्स’ या नव्या संकल्पनेचा जन्म झाला. जिंगल्स म्हणजे मोजक्या शब्दांचे गाणे. स्कोल हे ब्राझीलमधील बियरसारखे सर्वाधिक खपाचे पेय. त्यांचे जिंगल्स फारच बोलके आहे- ‘‘मी ब्राझिलियन आहे, हे मी गर्वाने आणि प्रेमाने सांगत आहे!’’
फुटबॉलवेडय़ा या देशात अगदी गल्लोगल्ली हे गाणे गुणगुणणारे आढळून येतात. विश्वचषकाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी मला हे गाणे ऐकता आले. हे गाणे चाहत्यांमध्ये इतके लोकप्रिय आहे की ब्राझीलच्या प्रत्येक सामन्यादरम्यान अनेक वेळा हे गाणे लावले जाते. कोस्टा रिका आणि ग्रीस यांच्यातील निरसवाण्या सामन्यानंतर चाहत्यांचा उत्साह मावळला होता. त्यातच विश्वचषकाच्या या अधिकृत गाण्याने त्यांच्या निराशेत आणखी भर घातली होती. ब्राझीलवासी म्हणजे आपले आयुष्य आनंदाने जगणारी माणसे, लिओनिन्हो म्हणाला. या गाण्यापेक्षा मी ब्राझिलियन आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. चला आपण मी ब्राझिलियन असल्याचा आनंद साजरा करूया, असे  म्हणत लिओनिन्हो मला घेऊन समुद्रकिनाऱ्यावर गेला.