बार्सिलोनातर्फे ४००वा सामना खेळणारा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने संघाच्या चारही गोलमध्ये मोलाचा वाटा उचलत चमक दाखवली. या सामन्यात ख्रिस्तियान टेलो याने हॅट्ट्रिक झळकावत बार्सिलोनाला कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लेव्हान्टेवर ४-१ असा विजय मिळवून दिला.
३१व्या मिनिटाला नाबील एल झार याने गोल झळकावत लेव्हान्टेला आघाडीवर आणले. पहिल्या सत्रात लेव्हान्टेने यजमान बार्सिलोनाला रोखल्यानंतर ५३व्या मिनिटाला जुआन गार्सियाने स्वत:च गोलजाळ्यात चेंडू ढकलत बार्सिलोनाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मेस्सी मैदानात उतरल्यावर त्याने लेव्हान्टेची बचावफळी भेदून गोलांचा धडाका लावला. त्याने रचलेल्या संधीवर टेलो याने ६०व्या, ८१व्या आणि ८६व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक साजरी केली.
‘‘मेस्सीसारखा खेळाडू आपल्या संघात असल्याचा आनंद होत आहे. बार्सिलोनाच्या चारही गोलमध्ये मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली,’’ असे टेलोने सांगितले. दरम्यान, मिकेल गोन्झालेझ याने केलेल्या दोन गोलांच्या बळावर रिअल सोसिएदादने रेसिंग सान्ताडेर संघावर ३-१ असा विजय मिळवला.
संडरलँडकडून मँचेस्टर युनायटेड पराभूत
मँचेस्टर : मँचेस्टर युनायटेडने लीग चषक फुटबॉल स्पर्धेच्या संडरलँडविरुद्धच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात २-१ असा विजय मिळवला. पण उपांत्य फेरीची ही लढत ३-३ अशी बरोबरीत सुटली. अखेर शूट-आऊटमध्ये मँचेस्टर युनायटेडला १-२ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. आता २ मार्च रोजी वेम्बले येथे होणाऱ्या अंतिम फेरीत संडरलँडचा मुकाबला मँचेस्टर सिटीशी होईल. युनायटेडकडून जॉन इव्हान्स व जेवियर हेर्नाडेझने तर संडरलँडकडून फिल बार्डसली याने गोल केला होता. पहिल्या टप्प्यात संडरलँडने २-१ असा विजय मिळवला होता. पेनल्टी शूट-आऊटमध्ये पाच प्रयत्नांत युनायटेडला एकमेव गोल करता आला. संडरलँडने दोन गोल करून आगेकूच केली.