* ५-० असा मिळवला विजय
* सोमदेव, युकीचे विजय
सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्री यांनी आपापल्या लढतीत सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. या विजयांसह भारताने डेव्हिस चषकाच्या आशिया-ओशॅनिया एक गटाच्या लढतीत इंडोनेशियाचा ५-० असा धुव्वा उडवला.
सोमदेव देववर्मनने डेव्हिड ऑग्युंग सुसांतला ६-३, ६-१ असे नमवले तर युकी भांब्रीने विष्णू अडी नुग्रहोचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला. भारताचे कर्णधार एस.पी. मिश्रा यांना सोमदेवच्या जागी सनम सिंगने खेळावे असे वाटत होते. मात्र अंतिम क्षणी सनमच्या मनगटाला दुखापत झाल्याने सोमदेवला संधी मिळाली आणि त्याने शानदार विजय मिळवला.
या दिमाखदार विजयासह भारताने एक गटातले स्थान अबाधित राखले आहे. २०१४ जागतिक गटाकरता पात्र होण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.
पहिल्या सामन्यात सोमदेवने पहिल्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. इंडोनेशियाच्या ऑग्युंगने आठवा गेम वाचवला, परंतु नवव्या गेममध्ये त्याचा फोरहँडचा फटका कोर्टच्या बाहेर गेला आणि सोमदेवने सेटवर कब्जा केला.
दुसऱ्या सेटमध्ये सोमदेवने २-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या गेममध्ये ऑग्युंगने सोमदेवला गुणांसाठी संघर्ष करावा लागला. पाचव्या गेममध्ये सोमदेवने ऑग्युंगची सव्‍‌र्हिस भेदली. सातव्या गेममध्ये ऑग्युंगची सव्‍‌र्हिस भेदत सोमदेवने दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.
दुसऱ्या लढतींमध्ये युकी भांब्रीने आपल्या प्रतिस्पध्र्याला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. दोन्ही सेटमध्ये फोरहँड, बॅकहँड, स्मॅश, ड्रॉप अशा वैविध्यपूर्ण फटक्यांची पोतडी उघडत युकीने नुग्रहोला निष्प्रभ केले.