नवी दिल्ली : भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीदरम्यान सामनानिश्चितीच्या प्रस्तावाचा आरोप केला आहे.

मनिकाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. परंतु या स्पर्धेतील लढतींसाठी तिने सौम्यदीप यांच्याऐवजी वैयक्तिक प्रशिक्षक सन्मय परांजपे यांची मदत घेतली. त्यामुळे भारतीय टेबल टेनिस महासंघाने मनिकाला यासंबंधी ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली होती. ‘‘मार्च महिन्यात दोहा येथे झालेल्या पात्रता स्पर्धेत सौम्यदीप यांनी त्यांच्या वैयक्तिक मार्गदर्शन केंद्रातील खेळाडूने ऑलिम्पिकसाठी पात्र व्हावे, यासाठी मी जाणूनबुजून हरावे, अशी विनंती केली. मात्र त्यांच्या अशा वागण्याने मला धक्का बसला. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सौम्यदीप यांची मदत घेण्यास मी नकार दिला,’’ असे मनिका म्हणाली.