Sourav Ganguly Brother and Sister in Law Video: टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. जीवावर बेतणाऱ्या या अपघातातून सुदैवाने ते वाचे. गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष आणि त्याची वहिनी अर्पिता यांच्याबरोबर पुरीमध्ये हा अपघात झाला, जिथे समुद्राच्या लाटांमुळे त्यांची बोट उलटली.
पुरीच्या समुद्रात गांगुलीचा भाऊ आणि वहिनी यांची स्पीडबोट उलटली. मच्छिमार आणि इतर लोकांमुळे त्यांचे प्राण वाचले. समुद्राच्या लाटांना धडकल्यानंतर ही बोट उलटली, त्यात चार पर्यटक होते. ज्यामध्ये दोघे सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी होते. या अपघातात चारही पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.
शनिवारी संध्याकाळी लाईटहाऊसजवळ ही घटना घडली. जोरदार लाटेला धडकल्यानंतर, स्पीडबोटचा तोल गेला आणि ती उलटली. माध्यमांशी बोलताना गांगुलीची वहिनी अर्पिता म्हणाली, “देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. मी अजूनही त्याच धक्क्यात आहे. अशी घटना कोणाबरोबरही नाही घडली पाहिजे आणि समुद्रातील स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी योग्यरित्या नियंत्रित केल्या पाहिजेत. कोलकात्याला परतल्यानंतर मी पुरीचे एसपी आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन.”
स्थानिक टेलिव्हिजन चॅनेल्सने प्रसारित केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये बोट एका मोठ्या लाटेला धडकताना, तोल गमावताना आणि खवळलेल्या पाण्यात उलटताना दाखवण्यात आले. दरम्यान बचावकार्य करतानाचाही व्हीडिओ समोर आला आहे.
गांगुलीच्या वहिनीने त्या प्रसंगाबद्दल सांगताना म्हटलं की, बोट जवळजवळ दहा मजली उंच लाटेला आदळली, ज्यामुळे स्पीडबोट उलटली आणि तिच्या व स्नेहाशिषसह सर्व प्रवासी समुद्रात फेकले गेले. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या सुरक्षारकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बोटीतील पर्यटकांना वाचवले. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी रबर फ्लोट्सचा वापर केला.
तिने आरोप केला की बोट अस्थिर होती, दहा जणांसाठी डिझाइन केलेल्या बोटीत फक्त चार प्रवासी होते, ज्यामुळे ती असंतुलित झाली आणि लाटेला आदळल्याने उलटली. अर्पिता यांना अशा बोटी चालवणाऱ्या चालकांवर कडक देखरेख ठेवण्याची आणि पुरी समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. पुरीचा समुद्रकिनारा खूपच खवळलेला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण, अद्याप कोणत्याही चक्रीवादळाचा अंदाज आलेला नाही.