भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीने स्पर्धेतील भारताच्या कामगिरीबाबत मत दिले. ”यूएई आणि ओमान येथे झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी सर्वात वाईट होती. गेल्या चार-पाच वर्षांतील ही सर्वात खराब कामगिरी होती”, असे गांगुली म्हणाला.

टी-२० वर्ल्डकपच्या बाद फेरीत भारताला पात्रता मिळवता आली नाही. सुपर १२ टप्प्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताच्या आशा मावळल्या. गांगुली म्हणाला, “२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत खूप चांगला खेळला. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, आम्ही ओव्हलवर पाकिस्तानकडून अंतिम फेरीत हरलो, तेव्हा मी समालोचक होतो. त्यानंतर इंग्लंडमध्ये २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत आम्ही दमदार प्रदर्शन केले आणि सर्वांना हरवले. उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून हरणे, हाच त्या स्पर्धेतील वाईट दिवस होता.”

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या संधीसाठी धावगती आणि इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागले, जे घडले नाही. भारताने त्यांच्या पुढच्या तीन सामन्यात अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला आरामात पराभूत केले, पण नशिबाने साथ दिली नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने एकही चूक केली नाही आणि स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.

हेही वाचा – IND vs NZ : ‘सचिSSन.. सचिन..!’ शुबमन गिलनं चौकार ठोकताच वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल!

गांगुलीने ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या शोमध्ये बोरिया मजुमदार यांच्याशी संवाद साधताना सांगितले, ”आम्ही या विश्वचषकात ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मी थोडा निराश आहे. मला वाटते, की गेल्या चार-पाच वर्षांत मी पाहिलेले हे सर्वात वाईट प्रदर्शन होते.” पाकिस्तानने भारतावर १० विकेट्सने, तर न्यूझीलंडने भारतावर ८ विकेट्सनी मात केली.