करोना व्हायरसमुळे बर्‍याच दिवसांपासून क्रिकेट बंद आहे. मात्र आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येत आहे. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौर्‍यावर असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतही नव्या ढंगात क्रिकेट पुनरागमन करणार आहे. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर २७ जून ला दक्षिण आफ्रिकेतील तीन संघांमध्ये एक सामना खेळला जाणार होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील अनुभवी आणि नामवंत खेळाडू सामील होणार होते, पण दक्षिण आफ्रिका सरकारकडून परवानगी न मिळाल्यामुळे तूर्तास तरी या आगळ्या-वेगळ्या सामन्याचे आयोजन लांबणीवर टाकण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतर क्रिकेट सामन्यांपेक्षा हा सामना आगळावेगळा आहे. कारण हा सामना दोन नव्हे तर तीन संघांदरम्यान खेळला जाणार असून त्याचे नियम वेगळे असणार आहेत. (वाचा आगळेवेगळे नियम) माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स, विद्यमान कर्णधार क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा यांच्या नेतृत्वाखालील तीन संघांचा हा सामना २७ जूनला खेळण्यात येणार होता, पण आता सामन्याचे आयोजन लांबणीवर पडले आहे. ज्या भागात हा सामना खेळवला जाणार होता, त्या भागात गेल्या आठवड्यात करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती लक्षात घेता हा सामना सध्या तरी खेळवण्यात येऊ नये असे द. आफ्रिका सरकारकडून सांगण्यात आले आहे. असा सामना भरवण्यासाठी आणि प्रेक्षकांना त्यात समाविष्ट करण्यासाठी अजून तयारीची गरज आहे. आवश्यक ती तयारी करून लवकरच हा सामना खेळवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती द. आफ्रिका क्रिकेट मंडळाने प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली.

या सामन्याची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली होती. हा सामना निधी जमवण्यासाठी खेळण्यात येणार असून यास Solidarity Cup असे नाव देण्यात आले आहे. या सामन्यातून जमा झालेला निधी करोना व्हायरसमुळे अडचणीत सापडलेल्यांना मदत म्हणून दिला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa postpones unique three team cricket match ab de villiers de cock kagiso rabada vjb
First published on: 22-06-2020 at 09:42 IST